आठवड्याच्या पहिल्या दिवशीच पश्चिम रेल्वे विस्कळीत, विरार-नालासोपारा दरम्यान सिग्नल बॉक्स जळाला
विरार-नालासोपारा दरम्यान सिग्नल बॉक्स जळाला असल्याने पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली आहे. विरार-नालासोपारा दरम्यान सिग्नल बॉक्स जळाला असल्याने पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सिग्नल बॉक्स जळाल्याने तांत्रिक बिघाड झाला असून पश्चिम रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहे. प्रशासनाकडून बिघाड तात्काळ दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र या बिघाडामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईच्या दिशेने निघालेल्या नोकरदारांचे हाल होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय घडलंय?
पालघर, डहाणू येथून मोठ्या संख्येने नोकरदार वर्ग मुंबईच्या दिशेने येत असतो. मात्र आज सकाळी त्यांना कामावर पोहोचताना थोडा संघर्ष करावा लात आहे. याचं कारण विरार ते नालासोपारादरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे. फटाके फोडताना सिग्नल बॉक्सला आग लागल्याने हा तांत्रिक बिघाड झाला आहे. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. यानंतर रेल्वे प्रशासनाकडून या सिग्नल बॉक्सच्या दुरुस्तीचं काम सुरु आहे. दरम्यान यामुळे लोकल 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहेत.
मध्य रेल्वेने 26 ऑक्टोबरला केला होता खोळंबा
26 ऑक्टोबर 2026 रोजी मध्य रेल्वे मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. कांजूरमार्ग स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेच्या रिले रूमला आग लागल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा जवळपास नऊ तास विस्कळीत झाली होती. या घटनेमुळे हजारो प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. यावेळी तब्बल 80 लोकल रद्द करण्यात आल्या. तसंच 90 मिनिटांपर्यंत विलंब होत होता. सेवा पूर्ववत होण्यासाठी 9 तास लागले होते.
26 ऑक्टोबर रोजी सकाळी साधारण 9.30 वाजता कांजूरमार्ग स्थानकाजवळील सिग्नल रिले रूममध्ये आग लागली होती. सिग्नल यंत्रणेशी संबंधित वायर जळाल्याने अनेक सिग्नल बंद पडले. यामुळे कांजूरमार्ग, भांडुप आणि विक्रोळी परिसरातील सिग्नल यंत्रणेवर परिणाम झाला. भांडुप ते विक्रोळी दरम्यानच्या सहाही रेल्वे मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला होता.
तसंच सकाळीच ठाणे-मुलुंड दरम्यान डाउन स्लो मार्गावरील ओव्हरहेड वायरवर एक वायर लटकताना आढळली. सकाळी 9.23 वाजता हा प्रकार निदर्शनास आला. दुरुस्तीसाठी तातडीने विद्युतपुरवठा बंद करण्यात आला. जवळपास 48 मिनिटांनंतर हा मार्ग पुन्हा सुरू झाला.
तीन प्रवाशांचा मृत्यू
रेल्वे सेवा विस्कळीत असतानाच 26 ऑक्टोबर रोजी भांडुप आणि घाटकोपर-विक्रोळी दरम्यान रेल्वे रुळांवर तीन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या. भांडुपमधील 21 वर्षीय साहिल थिटे यांचा रेल्वे रुळ ओलांडताना लोकलच्या धडकेत मृत्यू झाला. अन्य दोन मृत्यूंचे नेमके कारण तपासले जात होते.