बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर जुहू परिसरात गोळीबार करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली. या हल्ल्यात टायगर श्रॉफला कोणतीही दुखापत झाली नसली तरी भरवस्तीत अशाप्रकारे गोळीबार झाल्याने एकच खळबळ माजली आहे. टायगरवरील हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली आहे. अनिल पंडित याने सोशल मीडियावर पोस्ट करत हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळं अनिल पंडित हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले असून कोण आहे का हल्लेखोर, जाणून घेऊयात.
अनिल पंडित हा हरियाणातील पानिपत परिसरातील रहिवासी असून त्याचा गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याचा आरोप आहे. दिल्ली, हरियाणा आणि मुंबईतील काही हायप्रोफाइल गोळीबाराच्या घटनांशी त्याचे नाव जोडले गेले आहे. सोशल मीडियावरील पोस्ट आणि व्हॉइस मेसेजच्या माध्यमातून विविध हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणे ते धमक्या देण्याच्या घटनांमध्ये तो चर्चेत आला आहे.
अनिल पंडितने जून 2026मध्ये दिल्लीत पंजाबी अभिनेता आणि गायक गुरू रंधावा याच्यावर जिममध्ये गोळीबार केला होता. तशी पोस्टच त्याने सोशल मीडियावर केली होती. गुरू रंधावा आणि सलमान खान यांचे जवळचे संबंध असल्याने त्याच्यावर हल्ला करण्यात आला, असा दावाही त्याने केला होता.
अनिल पंडित हा 2022मध्ये भारतातून नोकरीच्या शोधात दुबईला गेला होता. त्यानंतर डंकी मार्गाने अमेरिकेत पोहोचला. तिथे त्याची ओळख गँगस्टर रणदीप मलिकशी झाली. तिथे पुढे त्यांनी वाहतूक व्यवसाय सुरू केला. पुढे दोघांनी गुन्हेगारी टोळ्या उभारल्याचा आरोप आहे. परदेशात राहून भारतातील विविध शहरांमध्ये घडणाऱ्या गोळीबाराच्या घटनांची जबाबदारी स्वीकारणे, सोशल मीडियावरुन धमक्या देणे आणि गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध असल्याचे दावे करणे या प्रकरात अनिल पंडितचे नाव चर्चेत आले.
मी, अनिल पंडित, लॉरेन्सचा धाकटा भाऊ आहे. आज मुंबईत टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी अनिल पंडित आणि माझा मोठा भाऊ, हरमन संधू, घेतो. आम्ही त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याने ऐकले नाही.
तो पुढे म्हणतो की, संपूर्ण चित्रपटसृष्टीत जो कोणी आमच्यापासून वेगळा होईल किंवा सलमान खानसोबत काम करेल, त्याला ठार मारले जाईल. हा पहिला आणि अंतिम इशारा आहे. सलमान खान, एक गोष्ट नीट ऐक: जर तू माझा मोठा भाऊ लॉरेन्सशी बोललास... तर मी तुझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून टाकेन. हे लक्षात ठेव. तुला वाटतं की तू सुरक्षित आहेस आणि तुझं काही होणार नाही, पण आम्ही तुझं असं काहीतरी करून दाखवू की संपूर्ण जग ते लक्षात ठेवेल. असं अनिल पंडित याने म्हटलं आहे. दरम्यान या ऑडिओ क्लीपची झी 24 तास पुष्टी करत नाही.