ऑक्टोबरमध्ये उन्हाची तीव्रता इतकी का वाढते? हवामानात हा बदल का होतो? वाचा सविस्तर
ऑक्टोबर महिन्यात साधारणपणे पावसाळा संपल्यानंतर वातावरणात बदल जाणवतो. पण हा बदल नेमका काय असतो? जाणून घ्या ऑक्टोबर हिट म्हणजे काय?
पावसाळा संपल्यानंतर अचानक उन्हाळ्यात वाढ होतो. सप्टेंबर महिन्यात साधारणपणे भारतातून पाऊस माघार घेतो. पावसाने माघार घेतल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात अचानक उन्हाचा तडाखा आणि उकाडा वाढतो. या भौगोलिक स्थितीला ऑक्टोबर हिट असं म्हणतात. पण ऑक्टोबरमध्ये तापमान का वाढते? खालील चार भौगोलिक कारणे आहेत.
निरभ्र आकाशः सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला मान्सून पूर्णपणे माघार घेतो. त्यामुळे आकाशातील ढग नाहीसे होऊन आकाश एकदम स्वच्छ (निरभ्र) होते. ढगांचा आडोसा नसल्यामुळे सूर्याची किरणे थेट आणि तीव्रतेने पृथ्वीवर पडतात, ज्यामुळे दिवसाचे तापमान झपाट्याने वाढते.
जमिनीतील आद्रता आणि गरम वाफः पावसाळा नुकताच संपलेला असल्यामुळे जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर ओलावा (आर्द्रता) असतो. जेव्हा तीव्र सूर्यप्रकाश या ओल्या जमिनीवर पडतो, तेव्हा जमिनीतून गरम वाफ बाहेर पडू लागते. यामुळे हवेतील दमटपणा (Humidity) कमालीचा वाढतो.
दुहेरी उष्णतेचा परिणाम: वरून येणारा कडक सूर्यप्रकाश आणि जमिनीतून निघणारी गरम वाफ या दुहेरी वातावरणामुळे हवामान अतिशय कोंदट, दमट आणि गुदमरवून टाकणारे (Oppressive) बनते. उन्हाळ्यातील ऊन कोरडे असते, तर ऑक्टोबरमधील ऊन हे घामाघूम करणारे आणि चिकट असते.
हवेच्या दाबातील बदल: ऑक्टोबर महिन्यात सूर्याचे दक्षिणायन सुरू झाल्यामुळे उत्तरेकडील कमी दाबाचा पट्टा कमकुवत होतो आणि त्याची जागा हळूहळू जास्त दाबाची प्रणाली (High-Pressure System) घेते. यामुळे वारे शांत किंवा मंद होतात, ज्यामुळे उकाडा अधिकच वाढतो.
दमट हवामान आणि तापमानाचा पारा वाढणे याच्या एकत्रितकरणामुळं ऑक्टोबरमध्ये उन्हाचे चटके आणि असह्य उकाडा जाणवतो.
एल निनोचा प्रभाव आणि उन्हाचे चटके
आताच्या घडीला एल निनोचा प्रभाव मध्यम स्वरुपाचा आहे. परंतु, त्याचा प्रभाव पुढील काळात वाढू शकतो. देशात नैर्ऋत्य मोसमी पावसाचा हंगाम संपल्याची घोषणा नुकतीच हवामान विभागाने केली. उत्तरेसह ईशान्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आकाश मुख्यतः कोरडे राहून दिवसाच्या तापमानात वाढ होत आहे. उष्णतेची लाट नसली तरी तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील.
अमरावतीत ऑक्टोबर हिटचा तडाखा
महाराष्ट्रातील उष्णतेने जोर पकडला असून, अमरावतीत ऑक्टोबर महिन्यातील विक्रमी तापमानाची नोंद झाली. 6 ऑक्टोबर रोजी अमरावतीचे कमाल तापमान 39.6 अंश सेल्सिअसवर पोहोचले. गेल्या 19 वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील तापमानाच्या नॉर्दीच्या तुलनेत हा सर्वाधिक आकडा आहे. अमरावतीमध्ये यापूर्वी 2007 मध्ये ऑक्टोबरमध्ये 39.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदा केवळ 0.1 अंश सेल्सिअसने अधिक तापमानाची नोंद होत जुना विक्रम मागे पडला. त्यामुळे 6 ऑक्टोबरचा दिवस अमरावतीच्या हवामान नोंदीत उष्ण दिवस ठरला. 6 ऑक्टोबरची 39.6 अंशांची नोंद ही उपलब्ध नोंदींनुसार अमरावतीतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान आहे. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 5 ऑक्टोबरला अमरावतीत 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते.