मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘चैत्यभूमी’ करण्याच्या राज्य सरकारच्या हालचालींना आता मनसेकडून विरोध होताना दिसतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामांतराची प्रक्रिया आगामी विधिमंडळ अधिवेशनात पूर्ण करण्याचे संकेत दिले. या पार्श्वभूमीवर दादर विभागातून संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. दादरमधील स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता नामांतराचा निर्णय घेऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रस्तावावर पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दादर नामांतरावरुन काय सुरुय? जाणून घेऊया.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आगामी विधिमंडळ अधिवेशनात पूर्ण केली जाईल, असे स्पष्ट केले. राज्य सरकारने या प्रस्तावाला यापूर्वीच तत्त्वतः मान्यता दिली असून केंद्र सरकारकडे पत्रही पाठवले आहे. केंद्राकडून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार विधिमंडळ समितीशी संबंधित प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर नामकरणाची पुढील कार्यवाही होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला. दादरमधील नागरिकांना हे नामांतर मान्य नसल्याचे त्यांनी म्हटलंय. सरकारने स्वतःहून निर्णय घेण्याऐवजी स्थानिक रहिवाशांशी चर्चा करावी आणि त्यांची भूमिका जाणून घ्यावी, अशी त्यांची मागणी आहे. दादरची ओळख आणि स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊनच पुढील निर्णय घ्यावा, असा त्यांच्या भूमिकेचा आशय आहे.
दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा यापूर्वी 2011 मध्येही चर्चेत आला होता. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर स्थानकाचे नाव बदलण्यास विरोध केला होता. केवळ नाव बदलल्याने कोणते प्रश्न सुटणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. नाव बदलण्याच्या राजकारणाला आपला विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादरमधील ‘राजगृह’ हे निवासस्थान आणि त्यांचे स्मृतिस्थळ असलेली चैत्यभूमी यामुळे या परिसराला आंबेडकरी चळवळीत विशेष महत्त्व आहे. चैत्यभूमीला अभिवादनासाठी देशभरातून अनुयायी येतात. त्यामुळे दादर स्थानकाला चैत्यभूमी नाव द्यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून आंबेडकरी संघटना आणि अनुयायांकडून केली जात आहे.
दरवर्षी 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी दाखल होतात. यंदाही या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुविधा, सुरक्षा, वाहतूक आणि स्वच्छतेच्या नियोजनाचा आढावा घेतला आहे. त्याचवेळी स्थानकाच्या नामांतराची घोषणा झाल्याने हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. एका बाजूला आंबेडकरी अनुयायांची अनेक वर्षांची मागणी, तर दुसरीकडे स्थानिक नागरिकांना विश्वासात घेण्याचा मनसेचा आग्रह, अशा दोन भूमिका आता समोर आल्या आहेत.