'15 डिसेंबरपर्यंत...', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, बंदी उठवली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आज सरपंचांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची भेट घेत असून त्यांच्यासोबत दिवाळीही साजरी केली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून, पाच हजार रुपये अनेकांच्या खात्यात जमा झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. याचवेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या फळबागा वाचवण्यासाठी एका मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. 15 डिसेंबरपर्यंत बोअरवेल बंदी उठवत असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. मात्र ही बंदी सरसकट उठवली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. नागपुरात सरपंचांशी संवाद साधल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
"ज्या ठिकाणी फळबागा आहेत आणि आता जर त्यांना वाचवलं नाही तर ती झाडं पुन्हा त्या पातळीला येण्यास 10-12 वर्ष लागतात. ज्या ठिकाणी काही काळासाठी बंदी उठवणं शक्य आहे तिथे ती उठवणार आहोत. ही बंदी सरसकट उठवली जाणार नाही. फक्त ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या फळबागा आहेत तिथे 15 डिसेंबरपर्यंत ही बंदी उठवणार आहोत," अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान यावर प्रशासनाची करडी नजर असेल असं त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान यावर प्रशासनाची करडी नजर असेल असं त्यांनी सांगितलं आहे. "कारण आपल्या भूगर्भातील पाणी मे महिन्यापर्यंत पुरवायचं आहे. खास बाब म्हणून फळबागा वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे," असं ते म्हणाले आहेत.
"फ्लशिंगला कायमची परवानगी आहे, ते कधीही करता येतं. फ्लशिंगवर बंदी नाही. केवळ खोलीकरणावर बंदी आहे, तीदेखील काही काळासाठी असणार आहे. त्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे," असं त्यांनी सांगितलं.
पुढे त्यांनी सांगितलं की, "काल रात्री आपण शेतकऱ्यांशी चर्चा केली. आज तालुक्यातील सरपंचांशी चर्चा केली. शेतकरी, गाव, शेती, रस्ते, तलाव यासंदर्भात विविध प्रश्न समोर आले. यातील बरेच मार्गी लागण्यासारखे आहेत. काही घोषणा आधीच जाहीर झाल्या आहेत. काही ठिकाणी तर पालकमंत्री, आमदारांनी त्यांना मान्यता दिली आहे. जी निवेदनं आली आहेत त्यावर कारवाई करु. ज्या सूचना आल्या आहेत त्यांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करु. अतिशय पोटतिडकीने शेतकरी, सररपंचांनी विषय मांडला आहे. आम्ही सर्वांचे विषय ऐकून घेतले आहेत, सर्वांची निवेदनं घेतली असून जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न असेल".
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या कौतुकावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की, "मी त्यांचे आभार मानतो. ही सर्वं प्रेरणा आम्हाला त्यांच्याडूनच मिळते. ते सातत्याने गरीब, वंचित, शेतकरी, दिव्यांग अशा विविध घटकांसोबत आपुलकीने व्यवहार करत प्राधान्याने प्रश्न घेतात. त्यांच्याकडूनच आम्हाला ही प्रेरणा मिळते".
रखडलेले सिंचन प्रकल्प आहेत, आपण 97 प्रकल्प पूर्ण केले आहेत आता उरलेल्या प्रकल्पांनाही मंजुरी दिली आहे, शेवटचा जिथे काम बाकी आहे त्यासाठी 15000 कोटींचा कर्ज घेऊन ते प्रकल्प पूर्ण करू, त्यामुळे विदर्भ किंवा मराठवाडा असेल त्यातील छोट्या छोट्या प्रकल्पांचा मोठा फायदा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.