भारतात हवामानात बदल होत आहेत. भारतातून मान्सूनने माघार घेतली आहे. महाराष्ट्रात उकाडा प्रचंड वाढला आहे. उष्ण व दमट हवामानामुळं तापमान वाढ झाली आहे. मात्र आता पुन्हा एकदा हवामानात बदल झाला आहे.
विदर्भात 18 ते 20 ऑक्टोबरदरम्यान हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तेव्हा तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याचा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळं उष्णतेमुळं त्रासलेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळणार आहे.
विदर्भातून परतीचा पाऊस माघारी फिरला असला, तरी ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात पुन्हा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पूर्व विदर्भातून ३ ऑक्टोबरपासून परतीच्या पावसाने माघार घेतली आहे. मात्र, येत्या 18 ते 20 ऑक्टोबरदरम्यान पूर्व विदर्भातील काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नागपूर हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान, वातावरणातील बदलांमुळे विदर्भातील कमाल तापमानातही दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तापमानात होत असलेल्या चढ-उतारामुळं पावसाला पोषक हवामान निर्माण झाले आहे. तसंच, तामिळनाडू आणि आंध्र पद्रेशच्या किनारपट्टीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं राज्यातील अनेक जिल्ह्यात हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
29 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाने गुरुवारी वर्तवलेल्या पुढील चार आठवड्यांच्या अंदाजानुसार 22ते 29 ऑक्टोबरदरम्यान मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह 17 ऑक्टोबरपासून पावसाची शक्यता वर्तवली आहे.