नागपूरमधील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत वडील मुलीचा छळ करत तिच्यावर अतिप्रसंग करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 45 वर्षीय पित्याने आपल्या 17 वर्षीय मुलीसोबत घाणेरडं कृत्य करत होता म्हणून मुलीने आपल्या बचावासाठी वडिलांवर लाकडी बॅटने हल्ला केला. या हल्ल्यामुळे वडील गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दारूच्या नशेत मुलीवर वडील सतत जवळीक साधायचे, शिवीगाळ करायचे एवढंच नाहीतर मारहाण करायचे असा आरोप मुलीने केला आहे. मृत व्यक्तीचे नाव जयपाल खोलपिटणे असं आहे. खोलपिटणे कुटुंबात पत्नी, 17 वर्षांची मुलगी, एक लहान मुलगा आहे. पत्नी घरकामासाठी गेल्यावर वडील मुलीसोबत असभ्य कृत्य करत होते, असं मुलीने सांगितलं. 17 वर्षांची मुलगी ही बारावीमध्ये शिकते. कुटुंबाने सांगितलं की, खोलपिटणे हे दारू पिऊन आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियासोबत वाद व्हायचा. ते मुलीला शिवीगाळ करायचे. तिला मारहाण करायचे. एवढंच नाहीतर तिच्यावर त्यांची वाईट नजर होती. गेल्या दोन वर्षांपासून वडिलांकडून हा मानसिक त्रास होत असल्याचा मुलीने पोलिसांना सांगितलं.
घटनेच्या दिवशीही जयपाल हा दारूच्या नशेत होता. त्यावेळी घरात मुलगी आणि लहान मुलगा होता. नशेत असताना त्याने मुलीशी अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला आणि मुलीने लाकडीच्या बॅटने वडिलांच्या डोक्यावर वार केला. यात जयपाल गंभीर जखमी झाला. यानंतर आई घरी आल्यावर तिने झालेला प्रकार सांगितला. मग जखमी अवस्थेत जयपालला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान जयपालचा मृत्यू झाला.