एका मांजरीच्या मृत्यूने नागपुरामध्ये भीतीचं वातावरण! दिवाळीच्या दिवशीच हे मांजर...; गूढ वाढलं, तपास सुरु
संपूर्ण परिसराला हादरवून टाकणारा हा प्रकार ऐन दिवाळीच्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास समोर आला आणि एकच खळबळ उडाली. नक्की घडलं काय जाणून घ्या सविस्तरपणे...
दिवाळीचा सण म्हणजे आनंदाचा आणि प्रकाशाचा उत्सव... मात्र, याच दिवशी नागपुरात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जादूटोण्याच्या संशयातून हा प्रकार घडल्याची चर्चा रंगली असल्याने परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र या साऱ्या प्रकारामागे नेमकं कोण आहे याचं गूढ कायम आहे.
नक्की कुठे घडला हा सारा प्रकार?
नागपुरमधील सर्वश्रीनगर परिसरात एका मांजरीला झाडाला फास लावून ठार मारण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी 8 नोव्हेंबर रोजी म्हणजेच दिवाळीच्या दिवशी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येणाऱ्या परिसरात ही घटना उघडकीस आली आहे.
मांजराला झाडावरुन उतरवून रुग्णालयात नेलं पण...
स्थानिक रहिवाशांकडून माहिती मिळताच प्राणीमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मांजरीला झाडावरून खाली उतरवले. तिला तातडीने जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. गळ्याला फास लागून श्वास गुदमरल्यामुळे मांजरीचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. मात्र हे कृत्य केलं कोणी याची माहिती समोर आलेली नाही.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
विशेष म्हणजे, जादूटोण्याच्या संशयातून हा प्रकार घडल्याची चर्चा परिसरात सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी हा प्रकार घडल्याने काळी जादू किंवा अघोरी प्रथेसाठी मांजरीचा असा निर्घृणप्रकारे बळी दिला असावा, अशी चर्चा परिसरामध्ये दबक्या आवाजात सुरु आहे. या घटनेनंतर प्राणीप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
सीसीटीव्ही फुटेज आणि इतर गोष्टींच्या माध्यमातून तपास सुरु
या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मूक्या प्राण्याची इतक्या क्रूरपणे कोणी आणि कोणत्या कारणासाठी हत्या केली हे अजून समोर आलेलं नाही. अंधश्रद्धेच्या अँगलला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. यासाठी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा केले जात असून एवढा सारा प्रकार होत असताना कोणी आरोपीला पाहिलं कसं नाही असा प्रश्नही स्थानिकांच्या चर्चेत ऐकायला मिळतो. आता पोलीस या प्रकरणामध्ये पुढे काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.