एकेरी उल्लेख करत नितेश राणेंची टीका, 'रोहित पवार हज यात्रेबद्दल कधी आपलं थोबाड उघडणार नाही, तिथे त्याला...'
भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर महानगर यांच्या वतीने ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ अभियानांतर्गत आयोजित ‘युवा शंखनाद’ कार्यक्रमादरम्यान नितेश राणे बुधवारी उपराजधानीमध्ये होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री नितेश राणेंनी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. रोहित पवारांना नाशिकमधील कुंभमेळ्यासंदर्भातील कामांतील कथित भ्रष्टाचारासंदर्भात भाष्य करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी नाशिकमध्ये बुधवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. यावरुनच नितेश राणेंनी एकेरी उल्लेख करत रोहित पवारांवर टीका केली आहे.
रोहित पवार काय म्हणाले होते?
"कुंभेमळा कामांबाबत नागरिक नाराज आहेत. 35 हजार कोटींची कामं समाधानकारक नाहीत. सिमेंटचे रस्ते असताना फोडून पुन्हा रस्ते केले जात आहेत. यामुळे अनेक अपघात होतात. अनेकजण जायबंदी झालेत. आम्ही सुद्धा धार्मिक आहोत. मात्र त्याचे राजकारण आम्ही करत नाही. सर्वसामान्यांच्या करातून ही कामे होत असताना भ्रष्टचाराविषयी बोलण्यासाठी मी नाशिकमध्ये आलो आहे," असं रोहित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं.
गोदावरीत पाणीच नसल्याचं रोहित यांचं विधान
धार्मिक भक्त असल्याने माझे आक्षेप आहेत. मिठाचा खडा म्हटले गेले मात्र कामातील खडे बघण्यासाठी मी आलो आहे. 2015 नाशिकमध्ये 2378 कोटी. उज्जैन 2017 मध्ये 47 कोटी, प्रयागराज 42 कोटी खर्च झाला. मात्र नाशिकमध्ये 35 हजार कोटी खर्च झालेला दिसत नाही. मला अनेक पुरोहित साधू महंत भेटले त्यांनीही या कामावर आक्षेप घेतला आहे. बाहेर कोट्यवधी रुपये खर्च होऊन उपयोग नाही. मात्र गोदावरीत पाणी नाही. प्रदूषण विभागाने ऑक्सिजन शून्य झाला आहे असे म्हटले आहे. तसेच केमिकलच्या पाण्याने कॅन्सर होऊ शकतो असे प्रमाण यात जाणवले आहे. अंबडमध्ये पाहणीत बिकट अवस्था आहे. ज्याने लोक बाधित होत आहेत. पाण्याचे प्रदूषण गंभीर संकट आहे," असं रोहित पवारांनी गोदावरीतील पाण्याची पातळी आणि दर्जाबद्दल चिंता व्यक्त करताना म्हटलं.
नक्की वाचा >>
'2047 मध्ये भारताला इस्लाम राष्ट्र बनविण्यासाठी...', जाहीर सभेत नितेश राणेंचं विधान; ‘एक दिवस भारतात...’; दिया मिर्झावरही साधला निशाणा
ध्वजारोहण कार्यक्रमातील गोंधळावरुन टीका
ध्वजारोहण कार्यक्रमावरही रोहित पवारांनी आक्षेप घेतला. "राष्ट्रपती येतात त्यांना काळाराम मंदिरात नेण्यात आले नाही हे दुर्दैव आहे. ध्वजारोहणात साधू महंत संत यांना बसण्यास जागा नव्हती. अधिकाऱ्यांचे नातेवाईक यांना जागा होती मात्र नाशिककरांना जागा नाही, दूजाभाव मोठ्या प्रमाणात झाला. भुजबळ यांनाही जागा देण्यात आली नाही, दोन्ही खासदारांना बोलावण्यात आले नाही, नगरसेवकांच्याही तक्रारी आहेत. पेशवेकालीन घाट उखडला, केवळ भ्रष्टाचार करायचा होता म्हणून हे करण्यात आले होते," असा आरोप रोहित पवारांनी केला.
नितेश राणेंचा टोला
नागपुरमध्ये याचसंदर्भात नितेश राणेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला. "रोहित पवार हज यात्रेबद्दल कधी आपलं थोबाड उघडणार नाही. तिथे त्याला अनियमितता दिसणार नाही. रमजान सणावेळी मोहल्यामध्ये धिंगाणा घातला जातो तेव्हा रोहित पवार बडबडताना दिसला नाही. यांना फक्त हिंदू सणाच्या वेळी, हिंदू धर्माच्या वेळी भूमिका घेण्यासाठी सुपारी भेटली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे," असं नितेश राणे म्हणाले. तसेच, "यांची भूमिका केवळ हिंदू सणाच्या वेळी असते. मात्र हज यात्रेच्या किंवा इतर सणाचे वेळी त्यांची भूमिका मांडताना आम्ही त्यांना बघितलं नाही. पश्चिम बंगाल येथील मशिदीच्या देणगीमध्ये अनियमितता झाली त्यावर रोहित पवार का बोलले नाही?" असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.