वाशिम क्राईम न्यूज : ज्या बापाने लेकीला लहानाचं मोठं केलं,तिच्या सुखी संसाराची स्वप्नं पाहिली,त्याच बापाने रागाच्या भरात तिचा गळा आवळून जीव घेतल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा येथे समोर आली आहे. कोणताच पुरावा नसताना पोलिसांनी या पित्याला अटक केली. पोलिस तपासात हत्येमागे अत्यंत धक्कादायक कारण समोर आले आहे.
पित्याने लेकीची हत्या केल्याचा आरोप आहे. इतकंच नव्हे, तर दुसऱ्याच दिवशी मुलीवर अंत्यसंस्कार करून अस्थींचे विसर्जनही करण्यात आले. मात्र, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीमुळे या घटनेचा उलगडा झाला.चौकशीदरम्यान पित्याने हत्येची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे .सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
वाशिम जिल्ह्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ब्राह्मणवाडा गावात ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष गोटे यांची 35 वर्षीय विवाहित मुलगी दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंधात असल्याच्या कारणावरून घरात वाद होत होते. वारंवार समजावूनही ती ऐकत नसल्याच्या रागातून संतोष गोटे यांनी तिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार करून काटेपूर्णा नदीत अस्थी विसर्जनही करण्यात आले.
मात्र,पोलिसांना या घटनेबाबत गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर संशयाच्या आधारे संतोष गोटे यांची चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार,चौकशी दरम्यान त्यांनी हत्येची कबुली दिली. आता मृत महिलेच्या आईकडून तक्रार घेण्याची प्रक्रिया सुरू असून,फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने शिरपूर पोलीस पुढील तपास करत आहेत.
घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेरील स्कायवॉकवर 25 ऑक्टोबर रोजी रात्री पती पत्नीमध्ये झालेल्या वादातून पतीने आपल्या नऊ महिन्यांच्या बाळाला खाली फेकल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत बाळ गंभीर जखमी झाले असून त्याला उपचारांसाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी वडिलांना अटक केली आहे अधिक तपास पोलिस करत आहे.
सातारा- सांगली जिल्हा हद्दीवर असलेल्या सोनसळ घाटात आढळलेल्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. दारू पिऊन त्रास देत असल्याच्या कारणावरून आई-वडिलांनी आणि सख्या भावाने खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. 15 ऑक्टोबर रोजी घरातच त्याची हत्या करून मृतदेह सोनसळ घाटात टाकण्यात आला होता.