कर्जतमध्ये टोरंट प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडीच्या जखमा अजून ताज्या असतानाच, आता विदर्भात आणखी एका मोठ्या जंगलतोडीचा घाट घातला जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. यवतमाळमधील रिलायन्स सिमेंटेशन प्रकल्पासाठी जवळजवळ 50 हजार अतिरिक्त झाडांची कत्तल करण्याचा धक्कादायक प्रस्ताव पुढे आला आहे. आणि या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करणारा, उद्याच्या बैठकीचा अजेंडा थेट 'झी २४ तास'च्या हाती लागला आहे!
उद्या केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागाची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार असून, याच बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. उद्या नवी दिल्लीत होणाऱ्या या बैठकीत हा प्रस्ताव 9व्या क्रमावर चर्चेला ठेवण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बड्या प्रकल्पांसाठी पुन्हा एकदा हजारो झाडांचा बळी दिला जाणार का? कोणाच्या आशीर्वादाने हा पर्यावरणाचा सौदा मांडला जातोय? असे खळबळजनक सवाल आता उपस्थित केले जात आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यात रिलायन्स सिमेंटेशन प्रकल्पासाठी आधीच 467.5 हेक्टर राखीव वनजमीन बहाल करण्यात आली आहे. यामध्ये पिंपरडवाड, हिरापूर आणि गोविंदपूर या तीन गावांतील जमिनीचा समावेश आहे. इतकंच नव्हे, तर ही वादग्रस्त जमीन टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यापासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर आहे.
- तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या कार्यकाळात 2009मध्ये रिलायन्स सिमेंटेशन प्रकल्पाला चालना
- वनसंवर्धन कायदा 1980 अंतर्गत 'सी क्लास' राखीव वनजमीन वळवण्याचा अधिकृत प्रस्ताव मे 2011मध्ये सादर
- महाराष्ट्र सरकारकडून एप्रिल 2012 मध्ये प्रस्तावाला मंजुरी
- केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून डिसेंबर 2012 मध्ये तत्त्वतः मंजुरी
- यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यात सिमेंट प्रकल्प उभारण्यासाठी 467.5 हेक्टर राखीव वनजमीन वळवण्यास 2018मध्ये मंजुरी
- यवतमाळच्या झरी जामणीमधील पिंपरडवाड, हिरापूर आणि गोविंदपूर या तीन गावांमधील वनजमिनीचा या प्रकल्पासाठी समावेश
- हा परिसर मुकुटबनजवळ, या भागात वाघांच्या प्रजननाची नोंद झाल्याची माहिती
- संबंधित वनक्षेत्र टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे 60 किमी अंतरावर
- या वृक्षतोडीला मंजुरी दिल्यास पर्यावरणप्रेमींचा संताप
आधी आरेमधील वृक्षतोड, त्यानंतर कर्जतच्या भीमाशंकर अभयारण्यातील झाडांची कत्तल... आणि आता थेट यवतमाळमध्ये 50 हजार अतिरिक्त झाडांच्या कत्तलीचा हा प्रस्ताव! एकामागून एक जंगलांचा घास घेण्याचं हे सत्र नेमकं कोणाच्या फायद्यासाठी सुरू आहे? या धक्कादायक प्रकारामुळे आता संपूर्ण राज्यभर संतापाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.