सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 31 ऑक्टोबर रोजी त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड आणि नवीन घाट येथे ध्वजारोहण होणार आहे. 2027मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी अनेक पायाभूत सुविधांचे काम हाती घेण्यात आले आहेत. अनेक प्रकल्प हे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. तर काहीचे काम सुरू आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
कुंभमेळ्यासाठी द्वारका सर्कल ते उपनगर नाका मार्गे दत्त मंदिर चौकापर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60चे रुंदीकरण होणार आहे. त्यासाठी 137.54 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आी आहे. 5.65 किलोमीटर लांबीचा रस्ता 47 मीटर रुंद करून आठपदरी करण्यात येणार आहे.
रस्त्याच्या मध्यभागी सहापदरी मुख्य रस्ता, तर दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन पदरी सेवा रस्ते उभारले जाणार आहेत. केंद्र सरकारने 221.52 कोटी रुपयांच्या निधीसह प्रकल्पाला मंजुरी दिली होती. मंजूर रकमेपेक्षा सुमारे 84 कोटी रुपये कमी दराने काम होण्याची शक्यता आहे. या रस्त्यांसाठी 15 दिवसांत आराखडा सादर करण्याची सूचना करण्यात आल्या आहेत.
द्वारका सर्कल ते उपनगर नाका मार्गे दत्त मंदिर चौकापर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 चे रुंदीकरण करण्यासाठी तांत्रिक तपासणी आणि मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. तसंच, मार्च 2027 पर्यंत रस्ता पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळाच्या शाही स्नानाच्या दिवशी तब्बल सव्वा दोन कोटी भाविक स्नान करतील. तर कुंभमेळ्याच्या इतर दिवशी रोज किमान दहा लाख भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये असतील, असा अंदाज नागपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ने व्यक्त केला आहे. नागपूर आयआयएम ला सिंहस्थ कुंभमेळा साठी लोकांची गर्दी आणि वाहतुकीच्या व्यवस्थापनासाठी सल्लागार म्हणून निवडण्यात आले आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या भव्य पर्वाचा शुभारंभ ठरणाऱ्या 31 ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अन्य मंत्री आणि अधिकारी - पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिले.