SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

महाराष्ट्रात 'मनी हाइस्ट' ३५ कोटींचं सोनं अन् 12 लाखांची रोकड, SBI बँकेतील दरोड्याचा मास्टरमाइंड निघाला बडतर्फ PSI

जळगावच्या भोकर गावातील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सशस्त्र दरोडा टाकल्याची बातमी समोर आली होती. सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक त्याच्यासह तिघांनी दरोडा टाकल्याची माहिती चौकशीत समोर.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 02, 2026, 10:08 AM IST | Updated: Nov 02, 2026, 10:10 AM IST
Image Credit: Jalgaon bank heist
Join

जळगाव जिल्ह्यातील भोकर गावात भरदिवसा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर सशस्त्र दरोडा पडतो. बँकेत प्रवेश करणारे दरोडेखोर थेट व्यवस्थापक आणि कॅशियरला लक्ष्य करतात. बंदुकीचा धाक दाखवतात. विरोध होताच हवेत गोळीबार करतात आणि तब्बल 16  लॉकरमधील कोट्यवधी रुपयांचे सोने आणि लाखोंची रोकड घेऊन पसार होतात!

या दरोडेखोरांना पोलिसांसोबतच ग्रामस्थही पुरून उरतात. काही तासांतच चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात येतात. पण या संपूर्ण दरोड्याचा सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे या टोळीचा कथित सूत्रधार दुसरा तिसरा कोणी नसून एक बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक असल्याची माहिती समोर आली आहे.

तारीख ३१ ऑक्टोबर. दुपारची वेळ साधारण अडीच वाजताची. जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. त्याचवेळी दोन दुचाकींवरून आलेले चार हेल्मेटधारी दरोडेखोर अचानक बँकेत घुसले. हातात बंदूक आणि चाकू सारखे हत्यार, बंदुकीचा धाक दाखवत त्यांनी व्यवस्थापक आणि कॅशियरला ताब्यात घेतले. विरोध होताच हवेत गोळीबार केला. त्यानंतर कर्मचाऱ्यांना मारहाण करून खुर्चीला बांधले आणि लॉकर उघडण्यास भाग पाडले

दरोडेखोरांनी तब्बल 16 लॉकरमधील सोन्याचे दागिने आणि रोकड लुटली. पोलिसांच्या माहितीनुसार 27 किलो म्हणजेच अंदाजे 35 कोटी रुपयांचे सोने आणि साडे 12 लाख रुपयांची रोकड लुटण्यात आल्याचा अंदाज आहे. सोन्याच्या बॅगा घेऊन दरोडेखोर पसार झाले. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. दरोड्याची माहिती मिळताच भोकरमधील ग्रामस्थांनी धाडस दाखवत दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. काही संशयितांना ग्रामस्थांनी अडवले, तर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी शोधमोहीम राबवत चारही संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईत लुटीतील मुद्देमालही पोलिसांच्या हाती लागला आहे

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दरोड्याचा कथित सूत्रधार बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक शंकर रमेश जासक असल्याची माहिती समोर आली आहे. 2023 मधील जळगाव शहरातील स्टेट बँक दरोडा प्रकरणातही त्याचे नाव आले होते. कारागृहात असताना त्याची गजानन राजेंद्र पवार याच्याशी ओळख झाली. याच ओळखीतून भोकर बँक दरोड्याचा कट आखल्याचा पोलिसांना संशय आहे. विशेष म्हणजे, आरोपींनी चादरी विकणारे फेरीवाले बनून बँकेची रेकी केली होती, अशी माहितीही समोर आली आहे

या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये शंकर रमेश जासक, अंकुश श्रावण चव्हाण, गजानन राजेंद्र पवार आणि अंकुश तुळशीराम चव्हाण यांचा समावेश आहे. यापैकी गजानन पवार हा खूनप्रकरणात कारागृहात होता, तर शंकर जासक याच्यावर यापूर्वीच्या बँक दरोडा प्रकरणाचाही आरोप आहे दरम्यान, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली. बँकेतून नेमके किती सोने आणि रोकड लुटली गेली, त्याची पडताळणी सुरू आहे. भरदिवसा बँकेवर दरोडा टाकण्याचे धाडस, कारागृहात आखलेला कट आणि ग्रामस्थांनी दाखवलेली सतर्कता. या संपूर्ण घटनेने बँकांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या दरोड्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? आणि लुटीतील संपूर्ण मुद्देमाल हस्तगत झाला आहे का? याचा तपास आता पोलीस करत आहेत

कारागृहात असताना अशा प्रकारचे गुन्हेगारी कट कसे रचले जातात. बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याचा या प्रकरणातील नेमका सहभाग किती? आणि बँकेच्या सुरक्षेतील त्रुटी कोणत्या? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातून समोर येणार आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES