श्वास घेण्यास त्रास होत असताना रुग्णालयात Admit करुन घेण्याऐवजी डॉक्टरांनी बाहेर प्रायव्हेटमध्ये... नाशिकमधला हादरवणारा प्रकार; पत्नीसमोर पतीने सोडला प्राण
सोनोग्राफी सेंटरच्या इमारतीखाली या रुग्णाला बसवून त्याची पत्नी त्याचं नाव नोंदवण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली. काही वेळाने ती परत आली तेव्हा हा रुग्ण बेशुद्धावस्थेत पडलेला आढळून आला. त्यानंतर त्याला पुन्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं.
नाशिकमध्ये एक हादरवून टाकणारा प्रकार समोर आला आहे. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचाराअभावी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून या प्रकरणानंतर नातेवाईकांनी आक्षेप घेतल्यावर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. मृत्यू झालेल्या रुग्णाचे डेथ ऑडिट करण्याच्या सूचना नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे.
कोणासोबत घडला हा प्रकार?
मिळालेल्या माहितीनुसार, पंचशील नगर परिसरात राहणारे विष्णू काकवीपुरे यांना शनिवारी अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना शालिमार परिसरातील संदर्भ सेवा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या रुग्णालयातून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. जिल्हा रुग्णालयात विष्णू काकवीपुरे यांना दाखल केल्यानंतर सोनोग्राफी करण्यासाठी खाजगी सोनोग्राफी सेंटरला पाठवले.
श्वास घ्यायला त्रास होत असतानाच बाहेर पाठवलं
सोनोग्राफी सेंटरमध्येच विष्णू यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आणि पुन्हा जिल्हा रुग्णालयात येताना त्यांचा मृत्यू झाला. रुग्णला श्वसनाचा त्रास होत असताना सोनोग्राफी करण्यासाठी बाहेर का पाठविले? सुरवातीला दिलेला केस पेपर मृत्यू झाल्यानंतर दडवून का ठेवण्यात आला? असा सवाल कुटुंबीय आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांनी उपस्थित केला. या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करत डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात आला असल्याने जिल्हाधिकारी नी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून 7 दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
केस पेपरमधून धक्कादायक खुलासा
विष्णू काकवीपुरे यांच्या पहिल्या केस पेपरमध्ये त्यांना श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता असं नमूद केलं आहे. डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि बाहेर प्रायव्हेटमध्ये जाऊन सोनोग्राफी करून या तेव्ह त्याला रुग्णालयात दाखल करुन घेतो असं सांगितल्याचा दावा केला जात आहे. जर एखाद्याला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्याला प्राथमिक उपचार करून स्टेबल करून सोनोग्राफीला पाठवलं जातं. सोनोग्राफी जीवापेक्षा जास्त गरजेची होती का? असा सवाल केला जात आहे. शासकीय रुग्णालयात ही महिला तिच्या नवऱ्याला घेऊन सिव्हिलसमोरील प्रायव्हेट सोनोग्राफी सेंटरला सोनोग्राफी करण्यासाठी घेऊन जात असताना रुग्णाला अधिक त्रास होऊ लागला. सोनोग्राफी सेंटरच्या इमारतीखाली त्यांना बसून त्यांची पत्नी वरच्या मजल्यावर सोनोग्राफी सेंटरमध्ये गेल्या. त्याचं नाव नोंदवून खाली त्यांच्या नवऱ्याला घ्यायला त्या परत आल्या पण तोपर्यंत ते जमिनीवर कोसळले होते.
विष्णू यांच्या पत्नीने आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने रिक्षाने परत पतीला शासकीय रुग्णालयात घेऊन गेली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर विष्णू यांना मृत घोषित केले.