मालेगाव नामपूर रोडवरील कृषी महाविद्यालय काष्टी जवळ एक संतापजनक घटना घडली होती. प्राथमिक माहिती नुसार दोन लहान बालिका घरी जाण्यासाठी गाडीची वाट बघत असताना जवळच असणाऱ्या झाडावरची बोर तोडून त्यांनी खाल्ली. मात्र त्याच ठिकाणी असलेल्या संशयित वसंत हिरे यांनी येऊन एका बालिकेला मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर संशयित वसंत हिरे याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तसंच, या मुलीचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळकरी मुलींनी झाडावरची बोरं तोडून खाल्ल्याने संशयित वसंत हिरे याने एका मुलीच्या कानाखाली मारली. तेव्हा ती विद्यार्थिनी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात जाऊन पडली. स्थानिक नागरिकांनी जेव्हा हिरे याला विरोध केला तेव्हा त्याने त्यांच्यावरही अरेरावीची भाषा केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत संबंधित व्यक्तीला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने नागरिकांशीही हुज्जत घालत 'काय करायचे ते करून घ्या' अशी अरेरावीची भाषा वापरल्याचे समोर आले आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संशयित वसंत दगा हिरे (वय 65) राहणार काष्टी याच्यावर 115/2 प्रमाणे कारवाई करण्यात आली असून वडनेर खाकुर्डी पोलिसांनी सदर संशयितास ताब्यात घेतले असून त्याबाबत चौकशी सुरू आहे. या प्रकरणी मुलीचा शोध सुरू असून मुलगी अल्पवयीन आहे का ? अल्पसंख्यांक आहे का ? अशा विविध प्रश्नांची चर्चा सुरू झाली असून या घटनेबाबत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे.