नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनतोड होण्याची दाट शक्यता आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील तब्बल 155 एकर जमिनीवरील जंगल तोडलं जाणार आहे. ही जंगलतोड नाशिक पश्चिम प्रादेशिक वनविभागाच्या इगतपुरी तालुक्यातील भावली ते खडकेद (बारी घाट) जिल्हा मार्गालगत काळुस्ते वनपरिमंडळात होणार आहे. या ठिकाणी असलेल्या जंगलापैकी 62.29 हेक्टर म्हणजेच 155.72 एकरावरच्या जंगलातील 6235 झाडांवर कुऱ्हाड पडणार आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचे हक्काचे घर उध्वस्त होणार आहे. केंद्र सरकारने या जागेवर दीड हजार मेगावॅटचा उपसा जलविद्युत प्रकल्प मंजूर केल्याने जंगलावर कुऱ्हाड पडणार असल्याचं सांगितलं जात आहे.
आजूबाजूला कोणती गावं?
भावली पंप्ड स्टोरेज प्रोजेक्ट नावाने उभारला जाणारा हा प्रकल्प इगतपुरी वनपरिक्षेत्रातील काळुस्ते वनपरिमंडळातील भावली बिटमधील गट क्र. 42 मधील राखीव जंगलाच्या जागेवर असेल. या 1500 मेगावॉट जलविद्युत प्रकल्पासाठी 6 हजारांहून अधिक झाडांचा बळी दिला जाणार आहे. या भागात भावली बुद्रुक, जामुंडे, गव्हांडे, कुरुंगवाडी, आंबेवाडी आदी गावे आहेत.
इको सेन्सिटिव्ह झोन
पश्चिम घाटात हा सारा भाग येत असून संपूर्ण परिसर 'इको सेन्सिटिव्ह झोन' असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सदर जंगली भाग हा विविध वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवासक्षेत्र असून या जंगलावर कुऱ्हाड कोसळल्यास जंगली प्राणी आणि मानवादरम्यानचा संघर्ष भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. जंगली प्राणी मानवी वस्तीत घुसण्याच्या घटना येथील जंगल तोडल्यास वाढू शकतात असं सांगितलं जात आहे. त्यामुळेच या प्रकल्पाला पर्यावरणप्रेमीकडून विरोध होताना दिसतोय.
हरिश्चंद्र अभयारण्याच्या सीमा तपासण्याची मागणी
भावलीमधील जंगल सह्याद्रीच्या पश्चिम घाटाचा महत्त्वाचा भाग असून याचे जतन-संवर्धन काळाची गरज असल्याचं वन्यजीवप्रेमी सांगतात. कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्याच्या सीमा पुन्हा तपासाण्याची मागणी केली जात असून हा भाग जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं असल्याचं पर्यावरणप्रेमींचं म्हणणं आहे. पश्चिम घाटाचा लचका तोडण्याचा हा प्रकार ठरु नये इतकी माफक अपेक्षा पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
इथं कोणती झाडं आहेत?
दुर्मीळ, अतिदुर्मीळ देशी वृक्षसंपदा या वनक्षेत्रात आहे. येथील जंगलात आईन, आपटा, आंबा, बांबू, चिंच, जांभूळ, धावरा, हिरडा, कुडा, शिवण, तोरण, बेहडा, ताम्हण, करंज, जंगली बदाम, धामण आदी विविध प्रजातीची डेरेदार वृक्ष आहे.
इथं कोणते प्राणी आढळतात?
येथील राखीव वनामध्ये बिबट्या, तरस, कोल्हा, लांडगा, जंगली ससा या वन्यप्राण्यांसह विविध प्रकारच्या नामशेष होणाऱ्या पक्ष्यांचा अधिवास आहे. या भागात भेकर, सांबर, खोकड, वानर, माकड हे वन्यप्राणीही दिसून येत असल्याचं स्थानिक ग्रामस्थ सांगतात.