नाशिक शहराला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. जूनापसून आता थेट नाशिकहून प्रवास करता येणार आहे. पांढुर्ली कनेक्टरचे काम नऊ महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन आणख्यात येत आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हटलं आहे.
सोनारी ते भगूरदरम्यान 26 किलोमीटरच्या नव्या मार्गाचे काम हाती घेण्यात येत आले आहे. या कनेक्टरमुळं नाशिक ते समृद्धी महामार्गाचे अंतर 10 ते 15 किमीने घटणार आहे. इगतपुरीमार्गे जाणाऱ्या वाहनधारकांची दुहेरी टोलमधून सुटका होणार आहे.
सोनारी, सोनंबे, शिवडे, पांढुर्ली, विंचूरदळवी ते भगूर या 26 किमीच्या रस्त्याच्या कामासाठी निविदापूर्वक बैठक पार पडली. आता निविदांची छाननी केली जाईल. या कामाची निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे यांनी सांगितले. या निमित्ताने नाशिकहून समृद्धी महामार्गाला जोडणारा सर्वात कमी अंतराचा कनेक्टर उपलब्ध होणार आहे. हा कनेक्टर डुबेरी, सोनारी, सोनंबे, शिवडे, पांढुर्ली, विंचूर, दलवी आणि भगूर या भागातून समृद्धी महामार्गाला जोडला जाईल.
कुंभमेळ्यापूर्वी सुरुवातीला दोनपदरी रस्ता तयार होणार असून भूसंपादनानंतर मार्गाचे चारपदरीकरण करण्याचे नियोजन आहे. या रस्त्यामुळं सिन्नरमार्गे जाणाऱ्या वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. सुमारे 240 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून अत्यल्प भूसंपादनाद्वारे तो पूर्ण करण्याची तयारी करण्यात आली आहे.
समृद्धी महामार्गावरुन मुंबई व नागपूरकडून नाशिककडे येणारी वाहतूक नाशिक-पुणे (सिन्नर) महामार्गावरुन होते. त्यामुळं या महामार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण येतो. प्रस्तावित मार्गामुं भविष्यातील वाहतूक कोंडी टाळता येणार आहे. तसंच, राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिककरांचे मुंबई, छत्रपती संभाजीनगर व नागपूरकडे जाणाऱ्या प्रवासाचे अंतर आणि वेळ वाचणार आहे.