त्र्यंबकेश्वर मंदिरासंदर्भात महत्त्वाची बातमी! 2 दिवस मंदिर भाविकांसाठी असणार बंद, काय आहे कारण?
त्र्यंबकेश्वर मंदिर दोन दिवस बंद राहणार असून प्रशासनाकडून भाविकांसाठी आदेश जारी करण्यात आला आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर 30 आणि 31 ऑक्टोबरला मंदिर दर्शन भाविकांसाठी बंद राहणार आहे. त्र्यंबकेश्वरचं मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातून भक्त दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे इथे नेहमीच भाविकांची मोठी गर्दी दिसून येते. खासकरून विकेंडला सुट्टीचे नियोजन करून त्र्यंबेकश्वर मंदिराच्या दर्शनासाठी भक्त येत असतात. त्यामुळे पुढील दोन दिवस हे मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे त्र्यंबकेश्वर शहरातील स्थानिक रहिवाशांना आणि अधिकृत दर्शन पासधारकांनाच मात्र मंदिरात दर्शनाची परवानगी देण्यात आली आहे. शुक्रवारी 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 31ऑक्टोबरला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी बंद असणार आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर 2 दिवस का बंद?
सिंहस्थ कुंभमेळा 2027 चे ध्वजारोहण शनिवारी 31 ऑक्टोबरला नाशिकच्या रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त कुंडावर ध्वजारोहण करून कुंभमेळाचा श्रीगणेशा करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कडक बंदोबस्तसह वाहतुकीमध्येही अनेक बदल करण्यात आले आहेत.
हेसुद्धा वाचा - नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी व्हीव्हीआयपींची नाशिकमध्ये उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह 8 मंत्री उपस्थित असणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री 10.30 वाजता ओझर विमानतळावर दाखल होणार आहेत. त्यानंतर पाथर्डी फाटा येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांचा मुक्काम असणार आहे.
सिंहस्थ कुंभाच्या धर्मध्वज शोभायात्रेने आज नाशिकची ग्रामपरिक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. चार जगद्गुरू आणि तीन आखाडाप्रमुखांचा सहभाग असणार आहे. तर दुपारी 1 वाजता तपोवनातील मोदी मैदानातून शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. या सोहळ्यासाठी एक लाख भाविक सहभागी होण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. या ग्रामपरिक्रममध्ये 50 चित्ररथ, साधू-महंतांच्या 15 बग्या आणि महाकुंभाची प्रतिकृती असणार आहे. तसंच 126 पथकांतून ढोल-ताशा, लेझीम, मर्दानी खेळ आणि सांस्कृतिक नृत्यांचे सादरीकरण होणार आहे. शिवाय 50 हजारांहून अधिक अनुयायी शोभायात्रेत सहभागी होणार आहे. तर सकाळी 6 वाजल्यापासून मिरवणूक मार्गावर वाहतुकीचे निर्बंध असणार आहे.