भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. कर्जत येथील पंप स्टोरेज प्रकल्पावरुन साटम यांनी मनसे अध्यक्षांना लक्ष्य केलं आहे. "काही उद्योग उरले नाहीत म्हणून कर्जतला जाऊन काही नेते, अभिनेते टुरिझम करतात," असा टोला राज यांनी केलेल्या कर्जत दौऱ्यावरुन लागवला आहे.
डिलीटच करायचे तर...
पंतप्रधान मोदींसंदर्भातील व्हिडीओ पोलिसांच्या सांगण्यावरुन डिलीट करत असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं होतं. मात्र यावरूनही साटम यांनी, "व्हिडीओ पोस्ट करुन डिलीट करणारे हे, डिलीटच करायचे तर पोस्ट करायचेच कशाला?" असा खोचक सवाल राज यांनी विचारला आहे.
नक्षली मनोवृत्तींना विरोधक मदतच करत आहेत
"कर्जतमधील पंप स्टोरेज प्रकल्पावरुन काही नेते, अभिनेते कर्जतला जाऊन पहाणीच्या नावाखाली टुरिझम करत आहेत. नेते, अभिनेते, समाज कार्यकर्ते तिथे जात आहेत. पर्यावरणाच्या नावाखाली अराजक-2 सुरू झालंय. पर्यावरणावर बोलणं ही एक फॅशन झाली आहे. ग्लोबल वॉर्मिंगवर बोलणं ही फॅशन झाली आहे. पर्यावरणाच्या नावाखाली अराजकता पसरवणा-यांना बाह्यशक्तींची मदत, नक्षली मनोवृत्तींना विरोधकही मदतच करत आहेत," असा आरोप साटम यांनी केला.
28 कोटी झाडं लावावी लागतील
"मात्र क्लिन एनर्जी म्हणजे काय याची शिकवणी यांनी लावावी. नेट झीरो म्हणजे काय याचे कॅल्युलेशन कळत नाही. नेते आणि अभिनेत्यांनी याची शिकवणी लावावी. 3000 मेगावॅटच्या थर्मल प्लांट लावला तर होणा-या कार्बन उत्सर्जनाला रोखण्याकरता 28 कोटी झाडं लावावी लागतील, 40 लाख गाड्या रस्त्यावर येतील इतके कार्बन उत्सर्जन होईल. त्यामुळे, पंप स्टोरेज प्लांट महत्वाचा आहे," असं साटम या प्रकल्पाचं समर्थन करताना म्हणाले.
जे बोलतात की सगळे प्रकल्प गुजरातसाठी जातात त्यांना सांगतो...
"टुरिझम करण्याची खाज असेल तर बीडमध्ये जाऊन ही खाज भागवा. कारण मुंबई महापालिकेच्या प्रकल्पातून 2 लाख झाडं बीडमध्ये लावणं अपेक्षित होतं. आदित्य ठाकरेंच्या बुद्धीचं वाळवंट झालं आहे, ते फक्त मोठमोठ्या बाता मारतात. जे बोलतात की सगळे प्रकल्प गुजरातसाठी जातात त्यांना सांगतो सुमन शहा आणि लक्ष्मीकांत शहा गुजरातीच होते आणि रमेश किणी प्रकरणात होते," असा टोला साटम यांनी लगावला. "मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मध्य वैतरणा प्रकल्पाकरता बीडमध्ये 2 लाख झाडं लावण्याची तरतूद होती ती पूर्ण झाली का याची चौकशी करावी आणि कारवाई करावी," असंही साटम यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे पाकीस्तानचा अजेंडा चालवतात
"राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की वीज इतर राज्यांना देणार का? तर प्राधान्यानं महाराष्ट्राला वीज देऊन बाकी वीज आजुबाजूच्या राज्यांना दिली जाणार- पाकीस्तानला वीज जाणार नाही," असा टोला अमित साटम यांनी लगावतानाच, "राज ठाकरे पाकीस्तानचा अजेंडा चालवतात," असं विधान केलं.
साईड अॅक्टर आणि मिमीक्री आर्टीस्टचे डायलॉग
राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आल्यासंदर्भात बोलताना, "एखाद्या कलाक्षेत्राचा कार्यक्रमासाठी पक्ष एकत्र येऊ शकतात. त्यात राजकीय काही नव्हतं," असं स्पष्टीकरण साटम यांनी दिलं. तसेच, "2019 पर्यंत मुख्यमंत्र्यांनी कायमच उद्धव ठाकरेंचा मानसन्मान राखला.मात्र डावीकडे गेल्यामुळे त्यांची ही अवस्था झाली. 2029 पर्यंत फडणवीसांना मुख्यमंत्री ठेवा असं राज ठाकरे म्हणाले पण सिनेमात साईड अॅक्टर आणि मिमीक्री आर्टीस्टचे डायलॉग सीरीयस घ्यायचे नसतात," असा टोला साटम यांनी लगावला आहे.