172 वर्षांचा इतिहास असलेल्या नगर परिषदेचे नाव आता अधिकृतपणे बदलण्यात येणार आहे. ब्रिटिश सरकारने सन 1854 मध्ये स्थापन केलेल्या या नगर परिषदेच्या नावबदलाचा ऐतिहासिक ठराव 28 सप्टेंबर 2026 रोजीच्या सभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील त्रिंबक नगर परिषदेचे नाव अधिकृतपणे बदलून आता 'त्र्यंबकेश्वर नगर परिषद' करण्यात येणार आहे. या नगर परिषदेला तब्बल 172 वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पत्रव्यवहार आणि ऑनलाइन माहिती सादर करताना 'त्रिंबक' नावामुळे होणारी अडचण दूर करण्यासाठी घेण्यात आला हा महत्त्वपूर्ण निर्णय.
त्रिंबक नगर परिषदेची स्थापना ब्रिटिश काळात झाली होती. भगवान शिवशंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामुळे आणि गोदावरी नदीच्या उगमस्थानामुळे (ब्रह्मगिरी पर्वत) या शहराला देशभरात अनन्यसाधारण धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे. प्रत्यक्षात देश-विदेशात हे स्थान 'त्र्यंबकेश्वर' म्हणून ओळखले जात असले तरी शासकीय कामकाजात 'त्रिंबक' असाच उल्लेख होत होता.
या क्षेत्राचे मूळ धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव अधिकृत दप्तरी ठळकपणे अधोरेखित व्हावे, यासाठी नगर परिषदेचे नाव 'त्र्यंबकेश्वर' करण्याची मागणी अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून केली जात होती. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता शासकीय दप्तर, अधिकृत दस्तऐवज आणि फलकांवर 'त्रिंबक' ऐवजी अधिकृतपणे 'त्र्यंबकेश्वर नगर परिषद' असा उल्लेख केला जाईल. नावबदलाची सूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व शासकीय नोंदी आणि नामफलकांवर 'त्र्यंबकेश्वर नगर परिषद' असाच अधिकृत उल्लेख केला जाणार आहे.
नाशिकच्या धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी आडगावमध्ये रामायण थीम पार्क साकारण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भाविकांना रामायणातील विविध प्रसंगांचा दिव्य अनुभव घेता येणार आहे. रामायण थीम पार्क महापालिकेच्या आडगाव येथील सर्व्हे क्रमांक 772 मधील राखीव जागेवर हा भव्य प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. महापालिकेवर अतिरिक्त आर्थिक भार न टाकता सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (पीपीपी) तत्त्वावर हा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिकच्या धार्मिक ओळखीला आणि पंचवटीच्या महात्म्याला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळणार आहे. रामायणातील प्रभू श्रीराम यांचे बालपण, अयोध्याकांड, अरण्यकांड, सुंदरकांड आणि युद्धकांड यातील प्रसंग अत्याधुनित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साकारले जाणार आहेत. त्यामुळं भाविकांना आणि पर्यटकांना रामायणातील पात्रांचा लाइव्ह अनुभव घेता येणार आहे. रामायणातील आदर्श, प्रभू श्रीरामांचे जीवनचरित्र वनवासातील प्रसंगहे सुद्धा पर्यटकांना अनुभवता येणार आहे.