आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात अनेक महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत. प्रशासनाकडून विविध कामांना गती देण्यात आली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी आडगावमध्ये रामायण थीम पार्क साकारण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भाविकांना रामायणातील विविध प्रसंगांचा दिव्य अनुभव घेता येणार आहे.
रामायण थीम पार्क महापालिकेच्या आडगाव येथील सर्व्हे क्रमांक 772 मधील राखीव जागेवर हा भव्य प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. महापालिकेवर अतिरिक्त आर्थिक भार न टाकता सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (पीपीपी) तत्त्वावर हा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिकच्या धार्मिक ओळखीला आणि पंचवटीच्या महात्म्याला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळणार आहे.
रामायणातील प्रभू श्रीराम यांचे बालपण, अयोध्याकांड, अरण्यकांड, सुंदरकांड आणि युद्धकांड यातील प्रसंग अत्याधुनित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साकारले जाणार आहेत. त्यामुळं भाविकांना आणि पर्यटकांना रामायणातील पात्रांचा लाइव्ह अनुभव घेता येणार आहे. रामायणातील आदर्श, प्रभू श्रीरामांचे जीवनचरित्र वनवासातील प्रसंगहे सुद्धा पर्यटकांना अनुभवता येणार आहे.
नाशिक आणि रामायणाचा संदर्भ पुराणातही आढळतो. प्रभू श्री राम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासातील काही काळ नाशिकमध्ये व्यतित केला होता. त्यामुळं पंचवटीला धार्मिक व पौराणिक महत्त्व आहे. तसंच, नाशिकमध्ये पर्यटकांची रेलचेलही अधिक असते. या पार्श्वभूमीवर थीम पार्क प्रस्तावित करण्यात आले आहे. नाशिकच्या रामायणकालीन वारशाचे आधुनिक दर्शन यानिमित्ताने होणार आहे.
1 ते 30 ऑक्टोबरपर्यंत त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त भाविकांसाठी बंद राहणार आहे. प्रशासनाने 31 ऑक्टोबरला असलेल्या सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाच्या तयारीसाठी कुंडाचे काम हाती घेतले आहे. कुंडाचे संवर्धन, दुरुस्ती, अद्यावतीकरण आणि सुशोभीकरणाचे काम हाती घेतल्याने कुंड राहणार बंद. १ ऑक्टोबरपासून ऐन पितृपक्षात भाविकांना आता कुशावर्तात स्नानाची संधी हुकणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरी एकाच वेळी ध्वजारोहण केले जाणार आहे. यानिमित्ताने त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्ताची कामे करण्यात आली आहे.