जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की अनेकदा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती एक नकारात्मक प्रतिमा आणि भौतिक सुविधांची वानवा. पण, आज आम्ही तुम्हाला अशा एका गावात घेऊन जाणार आहोत, जिथल्या एका छोट्याशा शाळेने हा सगळा समजच खोटा ठरवलाय. एक अशी शाळा जिथे सुट्टी हा शब्दच अस्तित्वात नाही. जिथे मुलं रविवारीही आनंदाने शाळेत जातात आणि चक्क 365 दिवस शिक्षणाचे धडे गिरवतात. पाहूयात, नाशिकमधल्या एका सुपर-स्कुलची ही प्रेरणादायी गोष्ट
एकाच वेळेस दोन्ही हातांनी लिहिणारी ही मुलं, दोनशेपर्यंतचे पाढे पाठ, ही मुलं आहेत हिवाळी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतली. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरपासून 40 किलोमीटर दूर डोंगरदऱ्यांच्या आणि निसर्गाच्या कुशीत लपलेल्या या गावात पायाभूत सुविधांची आजही इथे वनवा आहे. पण याच गावात शिक्षणाचा एक मोठा चमत्कार घडतोय.
इथली जिल्हा परिषदेची शाळा चक्क वर्षाचे 365 दिवस, सकाळी 8 ते रात्री 8 अशी तब्बल 12 तास भरते. आणि विशेष म्हणजे, मुलं कंटाळत नाहीत, तर शिक्षणात रमत आहेत. इथली पहिली ते पाचवीची मुलं पाहिली की त्यांची शैक्षणिक गुणवत्ता भल्याभल्यांना चकित करते. या चिमुकल्यांना चक्क 400 पर्यंतचे पाढे सहज तोंडपाठ आहेत. भारतीय संविधानाची सगळी कलमे, राष्ट्रीय महामार्ग आणि जगभरातल्या देशांच्या राजधान्या ते पुस्तक न पाहता सांगतात.
इतकच नाही तर बालवाडीतील मुलगी सुद्धा अब्ज आणि खर्गमधील आकडेवारी सुद्धा सहजपणे वाचून दाखवते. या जादूमागे एक अवलिया आहे. त्यांचं नाव शिक्षक केशव गावित.
लहानपणी पोटापाण्यासाठी त्यांनी मार्केट यार्डात अवघ्या 40 रुपये रोजाने हमालीदेखील केली. घरात 2013 सालापर्यंत विजेचा दिवा नव्हता, म्हणून चिमणीच्या प्रकाशात अभ्यास करत त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. पण यशाने त्यांना हुलकावणी दिली. मनातली हीच तगमग आणि आपलं अपूर्ण राहिलेलं स्वप्न त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये पाहिलं
केशव सरांच्या या मेहनतीचं फळ आज या शाळेत दिसतंय. अगदी बालवाडीत असल्यापासूनच त्यांच्याकडून वाचन-लेखन आणि कर्स्यू रायटिंग करून घेतलं जातं. ही मुलं चक्क इंग्रजीतून बोलतात आणि स्पर्धा परीक्षेचीही तयारी करत आहेत. ही शाळा फक्त पुस्तकी किडे घडवत नाही, तर विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने जगण्याची कौशल्ये शिकवतेय.
रोजगारभिमुख शिक्षणावर भर देत इथल्या मुलांनी पेंटिंग, फिटर, प्लंबिंग इलेक्ट्रिशियन आणि अगदी वेल्डिंग, शिवणकाम, गवंडीकाम, शेतीकाम अशी कौशल्ये आत्मसात केली आहेत.
ज्ञानाची भूक आणि शिक्षकाची दुर्दम्य इच्छाशक्ती असेल, तर डोंगरदऱ्यातही शिक्षणाची गंगा कशी पोहोचू शकते, याचं हे हिवाळी गाव म्हणजे एक जिवंत उदाहरण आहे. शिक्षण विभागांना आता या शाळेला शिक्षण पर्यटनाचा दर्जा देत सर्व लोकांनी इथे भेट देण्याचा आवाहन केले आहे.
केशव गावितंसारख्या एका हाडाच्या शिक्षकाने, कोणत्याही सुविधेची वाट न पाहता, या दोनशे लोकसंख्येच्या गावातून संपूर्ण राज्याला एक नवा आदर्श घालून दिला आहे. आज ही मुलं स्वतःचं आणि स्वतःच्या गावाचं भविष्य आपल्याच हातांनी लिहित आहेत. गरज आहे आपल्यासारख्यांनी त्याला साथ देण्याची.