पाणी म्हणजे जीवन... पण तेच पाणी जीवावर उठलं तर? नाशिकच्या दत्तनगरमध्ये बोअरवेलमधून येणारं पिवळं पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका ठरतंय... पाण्याच्या नमुन्यात कॅन्सरशी संबंधित क्रोमियम हेक्साव्हॅलंटचं प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा हजारपट अधिक आढळल्याचा दावा करण्यात आलाय. 25 हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय.. पाहूया नाशिकमधल्या या विषारी पाण्याचा धक्कादायक वास्तव उघड करणारा हा रिपोर्ट..
नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीजवळील दत्तनगरमध्ये बोअरवेलमधून येणारे पिवळे पाणी नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहे. या पाण्यात कॅन्सरला कारणीभूत ठरणारे 'क्रोमियम हेक्साव्हॅलंट' हे रसायन तब्बल हजार पट अधिक असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या गंभीर परिस्थितीचा अहवाल सादर केला होता.
दत्तनगर परिसरातील 25 हजार नागरिकांच्या आरोग्याशी हा जीवघेणा खेळ सुरू आहे. वैद्यकीय तपासणीत आतापर्यंत 19 रहिवाशांना त्वचेचे आजार झाल्याचे निष्पन्न झाले असून, या विषारी पाण्यामुळे कर्करोग आणि श्वसनाचे गंभीर आजार होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने प्रयोगशाळेत पाठवलेल्या पाण्याच्या नमुन्यात, क्रोमियमचे प्रमाण 0.05 मिग्रॅ प्रति लिटर अपेक्षित असताना ते चक्क 50.3 मिग्रॅ एवढे आढळले आहे. धरणांचा आणि भूगर्भाचा अभ्यास करणारे संस्थेने याबाबत तीव्र आक्षेप घेतले आहेत.
अंबड परिसरातील प्लेटिंग उद्योग याला कारणीभूत आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्याची पाहणी केली. तेव्हा इथल्या लोकांनी त्यांच्यासमोर आपल्या शरीरावर झालेले त्वचारोग दाखवत लहान मुलांनी त्याची गंभीरता दाखवून दिली केवळ त्वचा रोगच नाही तर कर्करोगासारखी भीषण समस्या यामुळे निर्माण होऊ शकते. अमेरिकेमध्ये असाच प्रकार आढळून आला असता स्थानिकांना 32 हजार कोटी डॉलरची भरपाई देण्यात आली होती. त्यावर एक चित्रपटही निर्माण करण्यात आला होता. पहिल्यांदाच अशा पद्धतीचे भीषण प्रदूषण भूगर्भात आढळून आले आहे
प्रक्रिया न केलेले दूषित पाणी नदीत सोडणाऱ्या अकरा कंपन्या सील करण्यात आल्या असून, अनधिकृत जलवाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्या तोडण्याच्या स्पष्ट सूचना अहवालात देण्यात आल्या आहेत. या भयंकर प्रकारानंतर अखेर जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि औद्योगिक विकास महामंडळाने संयुक्त कारवाईचा बडगा उगारला आहे.