SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

गोकुळनंतर सातारा जिल्हा बँकेतही अध्यक्षपदाचा ट्विस्ट! जयकुमार गोरेंच्या विधानाला शंभूराज देसाईंचे प्रत्युत्तर; अध्यक्षपदावरून महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता

गोकुळप्रमाणे सातारा जिल्हा बँकेतही मित्रपक्षांना अध्यक्षपदाची संधी मिळणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 11, 2026, 15:12 IST | Updated: Nov 11, 2026, 15:19 IST
Image Credit: सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता
Join

तुषार तपासे, प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी नाट्यमय घडामोडींनंतर महायुतीचे उमेदवार माजी आमदार राजेश पाटील यांची निवड झाली. गोकुळमधील या राजकीय घडामोडीनंतर आता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे सहकार आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. गोकुळप्रमाणे सातारा जिल्हा बँकेतही मित्रपक्षांना अध्यक्षपदाची संधी मिळणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यातच भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या विधानांमुळे अध्यक्षपदाच्या निवडीवरून महायुतीत रस्सीखेच होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत
 

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने स्वबळावर निवडणूक लढवत सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची एकत्रित सदस्यसंख्या भाजपपेक्षा अधिक होती. त्यामुळे दोन्ही मित्रपक्षांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावर दावा केला होता. असे असतानाही ही दोन्ही पदे भाजपकडेच राहावीत, यासाठी भाजपने जोरदार राजकीय डावपेच आखले. अखेर नाट्यमय घडामोडींनंतर भाजपने दोन्ही पदांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.या निवडणुकीच्या आदल्या रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. दुसऱ्या दिवशी सातारा पोलिसांनी जिल्हा परिषदेत प्रवेश करून सभागृहाकडे जात असलेल्या राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना ताब्यात घेतले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांच्यासोबत पोलिसांची धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. विधान परिषदेतही हा मुद्दा उपस्थित झाला. मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींना पोलिसांकडून गुन्हेगारांसारखी वागणूक दिल्याचा आरोप शंभूराज देसाई यांनी केला होता. त्यानंतर तत्कालीन उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यासह संबंधित दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे निर्देश सरकारला दिले होते

या संपूर्ण प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्याशी चर्चा केली होती. यापुढे अशा घटना घडणार नाहीत आणि महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांचा सन्मान राखला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली होती. त्यामुळे काही काळ महायुतीतील तणाव निवळल्याचे चित्र होते

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 21 जागांपैकी 10 जागांवर महायुती करण्यात आली. मात्र उर्वरित 11 जागांवर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा सामना रंगला.या निवडणुकीत भाजपने 9, राष्ट्रवादी काँग्रेसने 8, तर शिवसेनेने 4 जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे बँकेतील सत्तेचे गणित आणि अध्यक्षपदाची निवड याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

त्यातच अध्यक्षपदाच्या निवडीबाबत भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चेला आणखी उधाण आले. जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण होणार, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच ठरवतील. हा निर्णय स्थानिक पातळीवर होणार नसल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानातून अध्यक्षपदाचा निर्णय राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाच्या हातात असल्याचे संकेत मिळाले.

मात्र, गोरे यांच्या या भूमिकेला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी वेगळे मत मांडत प्रत्युत्तर दिले. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय स्थानिक पातळीवरच घेतला गेला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. वरिष्ठांनी या निवडीत लक्ष घालायचेच असेल, तर केवळ मुख्यमंत्रीच नव्हे, तर दोन्ही उपमुख्यमंत्रीही यामध्ये लक्ष घालतील, असे सांगत त्यांनी अध्यक्षपदाच्या निर्णयात सर्व घटक पक्षांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित केले

जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला महत्त्व दिले, तर शंभूराज देसाई यांनी स्थानिक पातळीवरील निर्णयाचा आग्रह धरला.मात्र अद्याप राष्ट्रवादी कडून भूमिका स्पष्ट झालेली नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ जागांमुळे या निवडीत त्यांची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे मात्र भाजप बँकेचे अध्यक्ष पद आपल्याकडेच ठेवण्याची रणनीती आखली असणार असं विश्लेषकांचा सांगणं आहे.

जिल्हा परिषदेत संख्याबळाचे गणित राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या बाजूने असतानाही भाजपने दोन्ही पदे मिळवली होती. त्यामुळे आता जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत भाजप मित्रपक्षांना संधी देणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मित्रपक्षाला अध्यक्षपदाची संधी मिळाल्यानंतर साताऱ्यातही तसाच राजकीय निर्णय घेतला जाणार का? की भाजप अध्यक्षपदावर स्वतःचाच दावा कायम ठेवणार? जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई यांच्या विधानांनंतर महायुतीतील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्षपद नेमके कोणाच्या वाट्याला जाणार, हे 18 तारखेला स्पष्ट होणार असल्याने याकडे आता संपूर्ण सहकार वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES