'सत्ता मिळवायची असेल तर 'ही' गोष्ट थांबवा', अमित शाहांचा राहुल गांधींना पुण्यातून सल्ला! '...नाहीतर 30 वर्षे तुमच्या पक्षाला सत्ता मिळणार नाही'
हैदराबाद येथे आयोजित काँग्रेसच्या 'भारत समिट 2026' या कार्यक्रमात इटलीच्या नेत्याने दिलेल्या घोषणेवरुन राजकीय वातावरण तापलेलं असतानाच अमित शाहांनी राहुल गांधींना दिला सल्ला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुणे दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, रविवारी विरोधीपक्ष नेते राहुल गांधींना एक सल्ला दिला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हैदराबाद येथे आयोजित काँग्रेसच्या 'भारत समिट 2026' या कार्यक्रमात इटलीचे नेते जियाकोमो फिलिबेक यांनी व्यासपीठावरून "व्होट चोर, गद्दी छोड" अशी घोषणा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींना खोचक सल्ला दिला आहे.
30 वर्षे तुमच्या पक्षाला सत्ता मिळणार नाही
जियाकोमो फिलिबेक यांनी दिलेल्या घोषणेवरुन राजकारण तापलेलं असतानाच अमित शाह यांनी, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करून सत्तेत येण्याची महत्वाकांक्षा पूर्ण होणार नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हाच मार्ग अवलंबल्यास पुढील 30 वर्षे तुमच्या पक्षाला सत्ता मिळणार नाही, असा दावाही आपल्या भाषणादरम्यान केला. पुण्यातील नॅशनल हेव्ही इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्हच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
...तर भविष्यात संधी मिळेल
राहुल गांधी यांनी परदेशात जाणे थांबवून देशातील गावागावात फिरावे. जनतेमध्ये राहून काम केल्यास कदाचित त्यांना भविष्यात संधी मिळू शकेल, असे शाह यांनी म्हटले आहे. "परदेशात फिरून देशातील सत्ता मिळणार नाही. परदेश दौरे बंद करून भारतातील गावागावांमध्ये फिरल्यास, जनतेत राहून काम केल्यास कदाचित तुम्हाला संधी मिळू शकते," असं अमित शाह राहुल गांधींना सल्ला देताना म्हटलं आहे.
भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही
काँग्रेसच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात मोठे घोटाळे झाल्याचा आरोप शाह यांनी आपल्या भाषणात केला. याउलट, पंतप्रधान मोदींच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात विरोधक भ्रष्टाचाराचा एकही आरोप करू शकले नाहीत, असं अमित शाह म्हणाले.
हैदराबाद येथे झालं काय?
शनिवारी, 14 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या काँग्रेसच्या 'भारत समिट 2026' या कार्यक्रमात भाषण करताना, जियाकोमो फिलिबेक यांनी लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवर भाष्य करताना राहुल गांधी यांना पाठिंबा दर्शवला. 'पार्टी ऑफ युरोपियन सोशलिस्ट'चे सरचिटणीस असलेल्या जियाकोमो फिलिबेक यांनी आपल्या भाषणात मतदार याद्यांमधील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला. 'एक व्यक्ती, एक मत' या तत्त्वाचे रक्षण करण्यासाठी राहुल गांधींनी उभारलेल्या मोहिमेचे कौतुक करत त्यांनी हिंदीत "व्होट चोर, गद्दी छोड" अशी घोषणा दिली. फिलिबेक यांच्या या घोषणेनंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी हसताना आणि टाळ्या वाजवताना दिसले.
भाजपाची टीका आणि काँग्रेसचं उत्तर
यावरून भाजपाने टीकास्र सोडलं आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह भाजप नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. परदेशी नेत्यांना व्यासपीठ देऊन देशाची बदनामी करणे आणि भारताच्या निवडणूक व्यवस्थेत परकीय हस्तक्षेपाला आमंत्रण देणे अयोग्य असल्याची टीका भाजपने केली आहे. तर या टीकेला उत्तर देताना काँग्रेसने, परकीय हस्तक्षेपाचे आरोप फेटाळून लावत निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावर सरकारने आत्मपरीक्षण करावे, असे म्हटले आहे. या टीकेच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांनी राहुल गांधींना सल्ला दिलाय.