सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील विजयानंतर पडळकारांची पहिली प्रतिक्रिया; खोत म्हणाले ‘अलीबाबाच्या गुहेत वाघाची..’
सांगली जिल्हा बँक निवडणुकीत आपल्या विजयाने भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
सांगली जिल्हा बँक निवडणुकीत आपल्या विजयाने भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. गोपीचंद पडळकरांनी जत सोसायटी गटातून विजयी होत महाविकास आघाडीचे विनोद पवार यांचा पराभव केला. गोपीचंद पडळकरांना 54 तर विनोद पवार यांना 34 मतं मिळाली. यासह गोपीचंजद पडळकरांनी 20 मतांनी जिंकत विजयाचा गुलाल उधळला आहे. गोपीचंद पडळकरांचा विजय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का आहे. विजयानंतर प्रतिक्रिया देताना गोपीचंद पडळकर यांनी जनतेने टप्प्यात कार्यक्रम केला म्हणत जयंत पाटील यांना टोला लगावला आहे.
“खरंतर सहकारमध्ये माझ्यासाऱखा कार्यकर्ता आला नाही पाहिजे अशी त्यांची योजना होती. गोपीचंद पडळकर आले तर गुंडगिरी होईल, ते सुसंस्कृत नाहीत अशा प्रकारचं वातावरण ते तयार करत होते. आता बँकेत मला लोकांनी इतक्या ताकदीने पाठवलं आहे,” असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलं आहे.
“हा फक्त जतचा मतदारसंघ असला तरी जिल्हा या निवडणुकीकडे लक्ष ठेवून होता. हा बँकेत गेला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. लोकांचा माझ्यावर खूप विश्वास होता. आज तुम्ही मला अडवण्याचा प्रयत्न केला, सहा वेळा कोर्टवारी केल्या आहेत. उद्याही पुन्हा कोर्टात जाणार आहे. पण आम्ही पूर्ण ताकदीने या सगळ्या प्रवृत्तीच्या विरोधात लढण्यास तयार आहोत. मला मतदान करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो,” असं ते म्हणाले आहेत.
हे ही वाचा - सांगली - पडळकरांच्या जत सोसायटी गटाच्या मतमोजणीदरम्यान मतपेटीत चिठ्ठी सापडल्याने खळबळ; आत लिहिलं होतं 'लिंगायत...'
पुढे त्यांनी म्हटलं की, “जिल्हा बँक सर्वसामान्यांसाठी खुली व्हावी, तिथे मध्यस्थाची आवश्यकता गरज नसेल. ज्या लोकांचं काम बँकेत असेल आणि ज्यांचं नियमात बसतं त्यांची अवडणूक होऊ नये अशी व्यवस्था आम्ही जिल्हा बँकेत करणार आहोत”.
अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन या निवडणुकीत त्यांनी लक्ष दिलं होतं. मतदानाच्या दिवसापर्यंत त्यांचे प्रयत्न सुरु होते. पण लोकांनी पाठबळ दिल्याने आणि नेते सोबत असल्याने हे सर्वांचं सामूहिक यश आहे असं ते म्हणाले आहेत.
‘अलिबाबाच्या गुहेत, गोपीचंद पडळकर वाघाची एन्ट्री’
अलीबाबाच्या गुहेत,गोपीचंद पडळकर वाघाची एन्ट्री झाली आहे. आता वाळव्याच्या गब्बरसिंगाने सावध राहावं असा टोला सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांना लगावला आहे. ते म्हणाले की, “प्रस्थापितांच्या चिरेबंद वाड्याला, गोपीचंद पडळकर यांच्या विजयाने तडा गेला आहे. वाळव्याच्या नेत्याने जिल्हा बँक अलीबाबाची गुहा बनवली होती, पण या अलीबाबाच्या गुहेच्या टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी आमचा वाघ आला आहे,. त्यामुळे वाळव्याच्या गब्बरसिंगाने सावध व्हावं”.