पुणे : भारतातील दुसऱ्या क्रमाकांचे सर्वात मोठे IT हब आणि भारतातील सर्वात मोठं ऑटो हब पुण्यात आहे. पुण्यातील हिंजवडी IT पार्क आणि पुण्यातील चाकण MIDC च्या माध्यमातून सरकारला कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, हिंजवडी आणि चाकण परिसरात सुविधांचा अभाव आहे. यामुळे हिंजवडी IT पार्क मधील कर्मचारी रसत्यावर उतरले. तर, चाकण MIDC मधील उद्योजकांनी स्थलांतराची घोषणा केली. यानंतर सरकाने हिंजवडी आणि चाकण परिसरातील समस्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंजवडी आणि चाकण परिसराच्या सुधारणेसाठी मोठी घोषणा केली आहे. 1826 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
चाकणमधील रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, पावसाळी पाणी निचरा व्यवस्थापन आदी समस्या तातडीने सोडवल्या जाणार आहेत. यासाठी 1400 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर, हिंजवडीतील वाहतूक कोंडीची समस्या सोडण्यासाठी 426 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत हिंजवडी आणि चाकण परिसराच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अंमलबजावणी यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. AI च्या माध्यामातून चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील वाहतूकीचे व्यवस्थापन केले जाणार आहे.
चाकणमधील पायाभूत सुविधा विकासासाठी एमआयडीसी, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि अन्य संबंधित यंत्रणांना एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चाकण औद्योगिक परिसरात पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या सोडवण्यासाठी नैसर्गिक नाले मोकळे करणे, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था उभारणे, कल्व्हर्ट आणि पुलांची क्षमता वाढविणे तसेच आवश्यक ठिकाणी पाणी साठविण्याची व्यवस्था उभारण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून मोठ्या संख्येने कामगार आणि नागरिक चाकणमध्ये येतात. त्यामुळे खासगी वाहनांची प्रचंड गर्जी होत असून वाहतूक कोंडी निर्माण होते. चाकणकडे जाणाऱ्या कामगारांसाठी मार्गनिहाय बससेवेचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. खाजगी वाहनांची संख्या कमी करण्यासाठी 500 अतिरिक्त बसेसची सेवा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चाकण औद्योगिक परिसरातील पाणीपुरवठा योजनेचे काम 2027 मध्ये पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. सध्या चाकण इंडस्ट्री असोसिएशनमार्फत सुरू असलेली पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे (एमजीपी) सोपविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
चाकण प्रमाणेच हिंजवडीतील समस्या सोडवण्यासाठी 426 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी ही हिंजवडीतील सर्वात मोठी आणि गंभीर समस्या आहे. हिंजवडी परिसरातील कचरा व्यवस्थापनासाठीही पिंपरी-चिंचवड महापालिका किंवा पुणे महापालिकेच्या माध्यमातून कचरा संकलन सुरू करण्यात येणार आहे.