'गोकुळ'वरुन महायुतीत गृहकलह? भाजपा V/s शिंदे संघर्ष; शिंदेंचा कौल सतेज पाटलांच्या बाजूने?
गोकुळमध्ये शासन नियुक्त चार सदस्य निवडीवरून एकनाथ शिंदेंची शिवसेना नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.
गोकुळमध्ये शासन नियुक्त चार सदस्य निवडीवरून एकनाथ शिंदेंची शिवसेना नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. लोकशाही मार्गाने जे सदस्य निवडून आले आहेत त्याचा आपण स्वीकार आणि जो जनतेने कौल दिला आहे त्याचा आपण सन्मान केला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेने मांडल्याचं समजत आहे. भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेशी शिवसेना सहमत नाही अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
गोकुळमध्ये 13 जागा निवडून आल्या म्हणून कोरम पूर्ण होत नाही. दोन किंवा तीन वेळा बैठक रद्द झाली तर निवडणूकच रद्द होईल, त्यामुळे महायुती सरकारने निर्णय घेतला अशी सरकारची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती आहे. अॅडव्होकेट जनरल यांचे मत घेऊनच निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.
उद्धव ठाकरेंचा सतेज पाटील यांना फोन
गोकुळच्या संघर्षात उद्धव ठाकरेंची शिवसेना सतेज पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे. सतेज पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. ही पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांना लगेचच उद्धव ठाकरे यांनी फोन केला. यावेळी त्यांनी सतेज पाटील यांना गोकुळच्या संघर्षात शिवसेना सोबत असल्याचा शब्द दिला.
हे ही वाचा - 'त्यावेळी आम्ही देखील...', फडणवीस सरकारने 'गोकुळ'वर 4 अतिरिक्त संचालक नेमल्यानंतर सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया; 'साडेपाच लाख...'
सतेज पाटलांची पत्रकार परिषदेतून टीका
"कॅबिनेटने दुर्दैवी निर्णय घेतला. फक्त गोकुळला डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला. गोकुळमध्ये सत्ता मिळवण्यासाठी हा निर्णय घेतला असून, कालचा दिवस काळा दिवस आहे. आम्ही यांचा निषेध करतो. साडेपाच लाख शेतकऱ्यांचा संसार याच्यावर अवलंबुन आहे. शेतकऱ्यांनी दिलेला कौल सरकारने नाकारला आहे. हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडून षडयंत्र रचलं गेलं आहे. निवडणूक तुमच्या बाजूने लागला नाही म्हणून कायदा केला. ज्यांना साडे पाच हजार लोकांनी नाकारले आहेत ते तज्ञ कसे होऊ शकतात," असा हल्लाबोल सतेज पाटलांनी केला आहे.
"गोकुळ केंद्रबिंदू म्हणून कायदा सरकारकडून काढण्यात आला. सहकारी ज्यावेळी होते त्यावेळी फक्त फेडरल इन्स्टिट्यूट गोकुळ आणि दोन संस्थांना लागू होणार आहे. यांना गोकुळमध्ये सत्ता मिळवायची आहे. जनतेने दिलं कौल नाकारायचे काम सरकार करत आहे," अशी टीका त्यांनी केली.
हसन मुश्रीफ यांना त्यांनी दोस्त ने दोस्तीत गद्दारी केली असल्याचं म्हटलं. 12 जण गोव्याला गेले त्यानंतर सुरत आणि आता उदयपूरमध्ये आहेत त्यांचा रूम नंबर सांगू का, आता कुठे आहेत असा टोला त्यांनी लगावला.
आम्ही कोर्टात जाणार आहोत. हायकोर्टात 7 दिवसांची नोटीस काढावी लागते. कायदेशीर लढाई आमची सुरू राहणार आहे. सगळे उदयपूरला आहेत. आम्हाला 13 चे बहुमत मिळेल. सत्तेत येईसाठी प्रयत्न सुरू आहेत असा आरोप त्यांनी केला.