पुणे विमानतळावर 'फुल इमर्जन्सी'; 192 प्रवाशांसह उड्डाण केल्यानंतर इंडिगो विमानाची चाकं बाहेरच, एकच धावपळ अन् अखेर...
पुण्यात इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय हवाई दलाकडून ‘फुल इमर्जन्सी’ घोषित करण्यात आली होती.
पुण्यात इंडिगो विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. 192 प्रवाशांसह विमानाने पुणे विमानतळावरुन उड्डाण केलं होतं. हे विमान पुण्याहून गुवाहाटीकडे जात होतं. मात्र तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. यादरम्यान भारतीय हवाई दलाकडून ‘फुल इमर्जन्सी’ घोषित करण्यात आली होती. सुदैवाने सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरुप असून कोणालाही दुखापत झालेली नाही.
नेमकं काय झालं?
पुण्याहून गुवाहाटीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या 6E 0623 या विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड झाला. विमानाची चाके आत न गेल्याने ती बाहेरच राहिली होती. यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय हवाई दलाकडून ‘फुल इमर्जन्सी’ घोषित करण्यात आली. विमानाच्या सुरक्षिततेसाठी अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या.
सकाळी 9 वाजून 4 मिनिटांनी विमानाचे पुणे विमानतळावर सुरक्षित लँडिंग झाले. विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह सर्व 192 जण सुखरूप असून, कोणालाही दुखापत झालेली नाही. प्रवाशांचा पुढील प्रवास पूर्ण करण्यासाठी इंडिगोकडून बंगळुरूहून पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे.
सोलापूर विमानतळावर लँडिंगवेळी शिकाऊ विमानाचा अपघात
गुरुवारी सोलापूर विमानतळावर काही वेळापूर्वी शिकाऊ विमानाचा लँडिंग दरम्यान अपघात झाला होता. प्रशिक्षणार्थी महिला वैमानिकाकडून सोलापूर विमानतळावर लँडिंग केले जात असताना अपघात घडला होता. अपघातानंतर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातातून बचावलेल्या प्रशिक्षणार्थी महिला वैमानिकाची तब्येत स्थिर आहे. मात्र विमानाचे नुकसान झाले.