Pune Crime News : पुण्यात भरदिवसा कोर्टाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाला आहे. या घटनेमुळे पुणे हादरले आहे. या घटनेमुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गुन्हेगारांवर पोलिसांना वचक राहिला असे आकरोप केले जात आहेत. या थरारक घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोळीबारातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातलं जाणार नाही. पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पोलिसांना कडक करावाई करण्याचे आदेश दिले आहेत.
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर मंदार किवळे नावाच्या तरुणावर 5 ते 6 जणांनी आधी गोळीबार केला. नेम चुकल्यानंतर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मंदार किवळे गंभीर जखमी झाला. धक्कादायक म्हणजे या हल्ल्यामागे शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील जुन्या वैमनस्याचा संशय व्यक्त होत आहे. 4 दिवसांपूर्वीच मंदार किवळे कारागृहातून बाहेर आला होता. या घटनेनंतर पुण्यातील टोळीयुद्धाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर घडलेली गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू आहे. दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही. पुण्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेला अधिक सतर्क आणि कठोर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष आणि गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यावर भर दिला जाईल. पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पोस्टमध्ये म्हंटले आहे.
दरम्यान, पुणे गोळीबार प्रकरणात 5 संशयित ताब्यात घेण्यात आले आहे. आंबेगावातून 2 तर दौंडमधून 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. राहुल चव्हाण, अमोल चव्हाण, गणेश चव्हाण आणि रोहण कानगुडे अशी या घटनेतीग इतर आरोपींची नावं आहेत.
ताब्यात घेतलेल्या संशयितांचा आजच्या हल्ल्यात थेट सहभाग आहे का? याचा तपास सुरू आहे. एप्रिल 2025 मध्ये झालेल्या शुभम चव्हाण खून प्रकरणाशी आजच्या घटनेचा संबंध असल्याचा संशय असून त्या प्रकरणातील काही जणांचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.