पुण्यातील न्यायालयाबाहेर मंदार किवळे याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सोशल मीडियावरील एका रीलची चर्चा सुरू झाली आहे. हल्ल्याच्या पाच दिवस आधी ‘किंग ऑफ कात्रज’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ‘बचके तू रहना रे’ या गाण्यासह रील पोस्ट करण्यात आल्याचा दावा केला जातोय. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
‘किंग ऑफ कात्रज’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून बब्या पवार याने ‘बचके तू रहना रे’ या गाण्याचा वापर करून रील पोस्ट केल्याचे दिसतंय. ही रील मंदार किवळेवरील हल्ल्याच्या पाच दिवस आधी पोस्ट करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळे या रीलची चर्चा सुरू झाली आहे.
मंदार किवळे हा शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी होता. या प्रकरणात तुरुंगात असलेल्या मंदारला 21 नोव्हेंबर रोजी जामीन मिळाला. बुधवारी, 25 नोव्हेंबर रोजी तो न्यायालयीन कामकाजासाठी शिवाजीनगर न्यायालयात आला होता. न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर दुपारी सव्वा एकच्या सुमारास त्याच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार केले. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन पिस्तुले आणि मॅगझिन जप्त केले. गंभीर जखमी मंदारला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यामागे पूर्ववैमनस्य असण्याची शक्यता पोलीस तपासत आहेत.
या हल्ल्यामागे शुभम चव्हाण हत्या प्रकरणातून निर्माण झालेल्या वैमनस्याचा संबंध असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. राहुल चव्हाण, अमोल चव्हाण, गणेश चव्हाण आणि रोहन कानगुडे अशी चार नावे हल्ल्यातील आरोपी म्हणून दिली जात आहेत.
मंदार किवळे यांची वकील अॅड. शुभांगी परुळेकर यांनी न्यायालयाबाहेर झालेल्या या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली. मंदार न्यायालयात हजेरीसाठी आला असताना त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हल्ल्याच्या वेळी उपस्थित असलेल्या अनेकांनी मदतीसाठी पुढे येण्याऐवजी मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रीकरण केले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. न्यायालयाच्या परिसरात अशा प्रकारे हल्ला होणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले.
जामिनावर बाहेर असलेल्या आरोपींना न्यायालयात हजेरी लावणे बंधनकारक असते. मात्र, हजेरीसाठी आलेल्या व्यक्तीवरच हल्ला होत असेल, तर हा सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न असल्याचे परुळेकर यांनी सांगितले. न्यायालयाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्याची आणि जामिनावरील आरोपींना प्रत्यक्ष हजेरीतून सूट देण्याबाबत न्यायालयाने विचार करण्याची मागणी त्यांनी केली. शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील अन्य एका जामिनावरील आरोपीवरही अशाच प्रकारे हल्ला होण्याची भीती असल्याचे त्यांनी नमूद केले.