'फडणवीसांनी डोळे वटारले तर...', सतेज पाटलांना चंद्रकांत पाटलांचा कोल्हापुरातून इशारा; थेट प्रॉपर्टीच काढली, 'वैचारिक उंची पाहून...'
गोकुळच्या अध्यक्षपदावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेले असतानाच आज मतदानाच्या दिवशी निकालाच्या आधीच महायुतीने जाहीर सभा घेत आपला अध्यक्ष निवडून येईल असं जाहीर करत सतेज पाटलांवर निशाणा साधला आहे.
कोल्हापूर सहकारी दूध संस्था म्हणजेच गोकुळच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडत असून संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे. काँग्रेस आमदार सतेज पाटलांच्या नेतृत्वाखालील समविचार आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकल्यानंतर कोरम पूर्ण न झाल्याने अध्यक्ष निवड रखडली. यानंतर सरकारने चार सदस्यांची संचालक म्हणून नेमणूक केली. याला सतेज पाटलांनी कोर्टात आव्हान दिलं आहे. मात्र आजच्या निवडणुकीच्या निकालाआधीच कोल्हापुरमध्ये महायुतीच्या नेत्यांनी सभा घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अत्यंत कठोर शब्दांमध्ये सतेज पाटलांवर निशाणा साधला.
महाविकास आघाडी म्हणजे बंटी पाटील एकटेच
"मला याची जाणीव आहे आपण तळपत्या उन्हात उभे आहात. जनता उन्हात आहे तर नेते देखील उन्हात उभे राहायचं असतं. गेल्या पंधरा दिवसापासून ज्या शिव्या शाप झाले ज्या पद्धतीने घोषणा दिल्या गेल्या त्या एका विजयाने संपणार आहे," असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला. "सोशल मीडियाच्या माध्यमातून महायुतीला बदनाम करण्याचा माहितीच्या नेत्यांना बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न झाला. निदान महायुतीमध्ये सगळे मित्र एकत्र आहेत. पण महाविकास आघाडी म्हणजे बंटी पाटील एकटेच आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना कुठे दिसली नाही, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कुठे दिसला नाही. सगळ्यांना पायाखाली घ्यायचं आणि आपली टिमकी वाजवायची," असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी समविचार आघाडीवर निशाणा साधला.
फडणवीसांनी डोळे वटारले तर...
"सतेज पाटील अजूनही बंटीच आहेत. ते कधीच साहेब झाले नाहीत. तुम्हाला 13 जागा मिळाल्या असल्या तरी आम्हाला 4 हजार 900 मतं मिळाली. गोकुळच्या हितासाठीच मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश काढला. डी. व्हाय. पाटील स्कूटरवरुन फिरायचे. आता तुमची संपत्ती किती?" असा सवाल चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांना केला. हम किसी को टोकेंगे नाही. टोका तो छोडेंगे नही. वैचारिक उंची पाहून बोला. काचेच्या घरात राहण्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारु नये. सतेज पाटलांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न! महायुतीचे संचालक शेतकऱ्यांच्या हिताचं काम करतील. फडणवीसांनी डोळे वटारले तर तुमचं साम्राज्य उद्धवस्त होईल," असा इशाराही चंद्रकांत पाटलांनी दिला.
आम्ही शब्द देतो कोल्हापूरमध्ये 'अमूल'ला...
आमदार विनय कोरेंनी आपल्या भाषणामध्ये, "रस्त्यावरची लढाई कोणी लढत असेल तर त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. आपला चेअरमन आपण करतोय. आम्ही सगळे एकत्र यायला पाहिजे होतं, परमेश्वर कोणाच्या बाजूने हे जिवंत उदाहरण आहे. तुमचा एक संचालक जादा आला म्हणून
तुम्हाला चेअरमन कराण्यासाठी निवडून दिलेले नाही. महाराष्ट्र सरकारला तुम्ही चॅलेंज करता पण तुम्ही खरंच बहुमतावर आला का याचा विचार करायला पाहिजे. अमूल दूध संघ नाव घेऊन बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही शब्द देतो कोल्हापूरमध्ये 'अमूल' दूध संघाला येऊ देणार नाही," असं म्हटलं.