नागपूर शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर करत एका व्यक्तीने पुण्यातील महिलेची आर्थिक फसवणूक केली आहे. मी वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा पीए असं सांगून पुण्यातील या डॉक्टर महिलेल तीन लाखांचा चुना लावण्यात आला. 43 वर्षीय महिला डॉक्टरचं नाव नेहा पेळपकर असं आहे.
या व्यक्तीने या महिला डॉक्टरला भीती दाखवली की, आम्ही विश्वास नांगरे पाटलांचे पीए आहे, तुमच्या आधार कार्ड आणि बँक खात्यातून दहशतवाद्यांना फंडिंग झाले आहे यामध्ये तुम्हाला अटक होईल. जर तुम्हाला यात फसायचं नसेल तर तीन लाख बँकेत ट्रान्सफर कर. त्यानंतर या महिलेने हे पैसे ट्रान्सफर केल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे.
याप्रकरणी मोबाईल धारक आणि लाभार्थी बँक खातेधारकाच्या विरोधात सिंहगड पोलिसात गुन्हे दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, महिलेने तक्रारमध्ये नमूद केलंय 22 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 22 ऑक्टोबरला या महिलेला एका अनोळखी नंबरवरून मोबाईलवर फोन आला. मी उचल्यावर तो व्यक्ती म्हणाली, मी सायबर सेल ऑफ इंडियामधून चौधरी बोलतोय आणि विश्वास नांगरे पाटील सरांचा पीए आहे. त्यानंतर परत एका अनोळखी नंबरवरून फोन आला. हा मोबाईल नंबर पहिला नंबर नव्हता. या फोनवर असलेला व्यक्ती म्हणाला की, मुंबई क्राईम ब्रँचचे वरिष्ठ अधिकारी आहे. ते म्हणाले की, तुमचे आधार कार्ड एका संशयास्पद नंबरला लिंक आहे. यातून तुम्ही अवैध जाहिरातबाजी आणि अश्लील मेसेज पाठवून पैसे कमवत आहात असं समोर आलं आहे. तुमचे नाव मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंगच्या गुन्ह्यात समोर आलं आहे.
आता जर तुम्हाला अटक टाळायची असेल तर आम्ही सांगू त्या बँक अकाऊंटमध्ये 3 लाख रुपये ट्रान्सफर करा. अटकेच्या भीतीने महिलेने 3 लाख रुपये ट्रान्सफर केले. वरिष्ठ पोलिसांच्या नावाचा डिजिटल अरेस्टची पहिलीच वेळ नाहीय. तर विश्वास नांगरे पाटील यांचा फोटो आणि आवाजाची नक्कल करत दोन भामट्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे यापूर्वीही 1 कोटी 4 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली होती.