बीड जिल्ह्यात शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या बातमीनंतर आता वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून 11 कंत्राटी डॉक्टरांना गंडवण्यात आलंय. या 11 कंत्राटी डॉक्टरांकडून नोकरी देण्यासाठी प्रत्येकाकडून 10 लाख घेण्यात आले. या घटनेमुळे पुण्यामध्ये खळबळ माजली आहे.
धक्कादायक म्हणजे तक्रारदार डॉक्टरांनी आरोप केलाय की, या नोकरीसाठी तीन डॉक्टरच एजंट म्हणून काम करतात. ही घटना तेव्हा उघड झाली तेव्हा या डॉक्टरांनी पैसा दिला, पण नोकरी मिळाली नाही. एवढंच नाहीतर त्यांना पैसेही परत देण्यात आले नाही. त्यामुळे या 11 पीडित डॉक्टरांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमधील या रॅकेटचा भांडाफोड केला. या तक्रारीनंतर डॉ. नानासाहेब भांगरे, डॉ. इरफान मुल्ला आणि डॉ. हेमंत वैद्य यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
एमडी आणि एमएस शिक्षण घेतलेल्या 28 डॉक्टरांना अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये कायमस्वरूपी निवड कऱण्यात येणार आहे. त्यामुळे याच गोष्टीचा फायदा घेत कंत्राटी डॉक्टरांकडून प्रत्येकी 10 लाख उकळण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे पुणे महापालिकेने अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज चार वर्षांपूर्वीच सुरू केलं आहे. दरम्यान पीडित डॉक्टरांनी या घटनेची माहिती सगळ्यात पहिले कॉलेजच्या ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या महापौरांकडे तक्रार केली. त्यानंतर तिथून काही मदत न मिळाल्यामुळे या डॉक्टरांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.