'गोकूळ'संदर्भात सतेज पाटील बोलले तेच होतंय! आज कोल्हापूरात फक्त मोर्चा नाही तर सकाळी 10.30 वाजता...
गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागांवरील विजयासहीत बहुमत मिळाले होते, तर विरोधी महायुतीला 12 जागा जिंकल्यात.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज, सोमवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात 'संघर्ष मोर्चा' काढण्यात येणार आहे. मात्र त्याचबरोबर रविवारी समविचारी आघाडी दाखल केलेल्या याचिकेमुळे या प्रकरणाची आज न्यायालयात देखील सुनावणी होणार असल्याने सतेज पाटलांनी सांगितल्याप्रमाणे रस्त्यावरची लढाई म्हणजेच मोर्चा आणि न्यायालयीन लढाई आजच होताना पाहायला मिळणार आहे.
न्यायालयीन लढाई
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात म्हणजेच गोकुळमध्ये शासन नियुक्त चार संचालक नेमून त्यांना मताचा अधिकारी देण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय बेकायदेशीर असून तो अध्यादेश रद्द करण्याबाबतची याचिका 'राजर्षी शाहू समविचारी आघाडी'ने रविवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल केली. या याचिकेवर आज सोमवारी सकाळी 10.30 वाजता सुनावणी होणार आहे. गोकुळ अध्यक्ष निवडीची सभा मंगळवारी होणार आहे. या सभेपूर्वीच राज्य सरकारने चार शासननियुक्त संचालक नेमून त्यांना मताचा अधिकार देण्याच्या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. राज्यपालांनीही त्याचा वटहुकूम काढला आहे. मात्र, हा वटहुकूम बेकायदेशीर असून तो रद्द करावा अशी मागणी या याचिकेत केली आहे.
नेमकं घडलंय काय?
सतेज पाटलांनी हाक दिलेला हा मोर्चा सकाळी 10 वाजता ऐतिहासिक दसरा चौकातून सुरू होणार असून तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागांवरील विजयासहीत बहुमत मिळाले होते, तर विरोधी महायुतीला 12 जागा जिंकल्यात. मात्र, अध्यक्ष निवडीच्या दिवशी महायुतीचे सदस्य हजर न राहिल्याने कोरम पूर्ण झाला नाही. त्यामुळ अध्यक्ष निवडीवरुन पेच निर्माण झाल्यानंतर राज्य सरकारने सहकार कायद्यात सुधारणा करून 3000 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या संस्थांमध्ये 4 शासननियुक्त (स्वीकृत) संचालक नेमण्याचा निर्णय घेतला. यामुळे महायुतीचे संख्याबळ वाढल्याची चर्चा आहे. असं झालं आणि या चार शासननियुक्त संचालकांनी महायुतीच्या बाजूने मतदान केलं तर सतेज पाटील यांच्या 'समविचारी आघाडी'च्या हातातील बहुमत निसटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सतेज पाटलांची टीका
सरकारने अध्यादेशाच्या आडून घेतलेला हा निर्णय म्हणजे 'सभासदांच्या कौलावर सरकारी दरोडा' असल्याची टीका सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना नोंदवतील. तसेच हा निर्णय म्हणजे कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान आहे, अशी टीका सतेज पाटील यांनी केली. 'गोकुळ तुमची जहागीर नाही, अहंकाराची मस्ती कोल्हापूर उतरवतं' असा इशारा सरकारला देत आजच्या मोर्चाची हाक दिली आहे.