कोल्हापूरच्या हातकणंगले जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हातकणंगले येथील सांस्कृतिक भवनासमोरील मंदिर परिसरात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. शविवारी रात्री 9च्या सुमारास ही घटना घडली असून घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तसंच, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले.
प्राथमिक तपासानुसार, स्वरा नितीन उपाध्येय असं मयत मुलीचे नाव आहे. संबंधित मुलगी नववीच्या वर्गात शिकत असून मंदिर परिसरात ध्वनीमुद्रणाचे आवाजात संबंधित मुलीच्या गळ्यावर धारदार शास्त्राने वार केला. वार इतका जोरदार होता की मुलीचा गळा निम्मा चिरलेला होता. शिवाय दंडावर वार झाल्याने ती जागेवरच गतप्राण झाली. आवाज ऐकताच परिसरातील नागरिक जमा झाले आणि तिला तात्काळ इचलकरंजी येथील आयजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी नंतर वैद्यकीय पथकाने मुलीस मृत घोषीत केले.
16 वर्षीय अल्पवयीन स्वरा नितीन उपाध्ये हिचा धारदार शस्त्राने वार करून संशयित 37 वर्षीय संशयित आरोपी अरुण लगमावर याने एकतर्फी प्रेमातून खून केला. याबाबत अधिक माहिती अशी की, मयत स्वरा ही जैन मंदिर परिसरात राहत होती. आरोपी अरुण स्वराकडे वाईट नजरेने पाहत होता. पण याकडे तिने दुर्लक्ष केले होते. नवरात्र उत्सव असल्याने वैष्णवी मंदिरामध्ये आरतीचे कार्यक्रम सुरू होते. नेहमीप्रमाणे स्वरा आरती आटोपून घरी येत असताना रस्त्यावर कोणी नसल्याचा फायदा घेत अंधारामध्ये दबा धरून बसलेल्या संशयित आरोपी अरुण लगमावर याने एडक्याने स्वरा हिचा गळा कापून हाता पायावर गंभीर वार केले. ती मृत पावल्याची खात्री करून तो पसार झाला होता.
ही केस जलद गती न्यायालयात चालवून आरोपीला गावामध्ये चौकात फाशी द्यावी, आरोपीला तात्काळ अटक करावी जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत मृतदेहवर अंतिम संस्कार करणार नसल्याचा इशारा संतप्त महिला आणि ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला दिला. संतापलेल्या महिलांनी आरोपीच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून याला परवानगी दिली नाही. पण संतप्त महिलांनी मयत स्वराला न्याय मिळावा यासाठी आज सायंकाळी पाच वाजता कॅण्डल मार्च काढून गावातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला आहे. या घटनेने प्रचंड संताप निर्माण झाला असून गावामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.