पायल झांबरे मृत्यू प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई! घरातून 35 तोळे सोने आणि चांदीचे दागिने जप्त
पुण्यातील पायल झांबरे मृत्यू प्रकरणी पती अक्षय झांबरे आणि सासरे अरविंद आणि सासू मंगल यांना 9 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी मिळाली आहे.
पुण्यातील पायल झांबरे मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु असून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पायल झांबरेच्या घरातून 35 तोळे सोनं आणि चांदीचे दागिने पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत. पायलच्या मृत्यूनंतर माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर हुंडा आणि सोन्याच्या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला होता. दरम्यान पायलचा मोबाईल आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे.
दरम्यान पायलचा पती, सासू आणि सासर्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसाची न्यायालयाकडून वाढ करण्यात आली आहे. पायलचा पती अक्षय झांबरे, सासरे अरविंद झांबरे, सासू मंगल झांबरे यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केलं होतं. तिघेही 9 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत असणार आहेत.
नेमकी घटना काय?
पुण्याच्या मुकुंदनगर परिसरातील अक्षय हाइट्स सोसायटीमधील जुन्या फ्लॅटमध्ये पायल अक्षय झांबरे या सॉफ्टवेअर अभियंता विवाहितेचा मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. प्रसिद्ध व्यावसायिक बाळासाहेब झांबरे यांनी सून असणाऱ्या पायलने गळफास घेत करत टोकाचं पाऊल उचललं होतं. पायलच्या मृत्यूनंतर माहेरच्यांनी सासरच्यांवर गंभीर आरोप केले होते. मुलगी झाली म्हणून छळ करण्यात आला, तसंच 50 तोळे सोने, जमीन अन् पैशांसाठी सासरच्यांनी जाच केल्याचा आरोप आहे. ‘माझ्या आत्महत्येला सासू जबाबदार’ असा भावाला तिने शेवटचा मेसेज केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2019 मध्ये पायलचं अक्षयळी लग्न झालं. लग्नावेळी माहेरच्यांनी लाखोंमध्ये खर्च केला होता. 50 तोळे सोने, 25 लाख रुपये रोख आणि लग्नासाठी सुमारे 70 ते 80 लाख रुपयांचा खर्च झाला होता. लग्नानंतर सासरच्यांनी हुंड्यासाठी तगादा लावला होता. यावेळी पैशांसह सोन्याची मागणी केली जात होती. मुलगी झाल्यानतंर हा छळ आणखीनच वाढला होता. यानंतर पायल काही काळ माहेरी होती. नंतर मध्यस्थी करत तिला पुन्हा सासरी पाठवण्यात आलं होतं. पण त्यानंतरही तिचा छळ सुरु होता. याच छळातून अखेर तिने आत्महत्या केली.
एकनाथ शिंदेकडून कारवाईचं आश्वासन
पायल झांबरे यांच्या परिवाराला एकनाथ शिंदे यांनी फोन करत हे प्रकरण आम्ही फास्ट्रॅक वर चालवणार असं आश्वासन दिलं आहे. पुन्हा असे कोणी वागणार नाही, धाक दाखवण्याचं काम करू असं ते म्हणाले. कोणालाही आम्ही सोडणार नाही या प्रकरणात मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालतो असंही आश्वासन त्यांनी दिलं.
9 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात अक्षय झांबरे आणि सासरे अरविंद आणि सासू मंगल यांना 9 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.