मोठी बातमी! पुण्याचं नाव बदलून 'फुले नगर' करणार? 2027 सालाशी याचं काय कनेक्शन?
पुणे शहराचं नाव बदलण्याची मागणी करताना नेमका काय युक्तिवाद करण्यात आला आहे? नक्की कोणत्या ठिकाणांचा संदर्भ ही मागणी करताना दिला आहे जाणून घेऊयात सविस्तरपणे...
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीचं शहर असलेल्या पुणे शहराचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. पुण्याचे नामकरण 'महात्मा फुले नगर' किंवा 'फुले नगर' करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी काल मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून ही मागणी करण्यात आली आहे. त्यांच्या या मागणीला पुण्यातील समस्त फुले प्रेमी व ओबीसींचा पाठिंबा असल्याचं सांगण्यात आलं आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन सादर केले आहे.
उत्तर प्रदेशचा संदर्भ दिला
उत्तर प्रदेशमधील अमरोहा जिल्ह्याचे नामकरण फुले नगर करण्यात आले, औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यात आले, अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर करण्यात आले, इस्लामपूरचे नामकरण ईश्वरपूर करण्यात आले. तर मग महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांची कर्मभूमी असलेल्या पुणे शहाराचे नामकरण माहात्मा फुले नगर केले तर गैर काय? असा सवाल करत राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाकडून ही नामकरणाची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मान्य झाली तर पुण्याचं नाव बदलण्यात येईल.
...म्हणून पुण्याला जोतिरावांचं नाव द्या!
2027 मध्ये समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या जन्माला 200 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हे नामकरण करण्यात यावे असे राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा संघटनेने म्हटले आहे. पुणे शहर ही महात्मा जोतिराव फुले यांची मुख्य कर्मभूमी होती. त्यांनी शिक्षण आणि सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात पुण्यातूनच मोठे कार्य उभे केले असल्याने शहराला त्यांचे नाव देणे योग्य ठरेल असा युक्तिवाद संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
इतरही महत्त्वाच्या मागण्या
राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नामांतरासोबतच इतरही काही मागण्यांचा समावेश आहे. महात्मा फुले यांच्या कार्यावर चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे एकदिवसीय विशेष अधिवेशन आयोजित करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच महात्मा जोतिराव फुले यांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणीही पत्रातून केली आहे. याचप्रमाणे विशेष आमसभा आयोजित करण्यासंदर्भातील नियोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विशेष आमसभा घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा, असं राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा संघटनेनं आपल्या पत्रात म्हटलंय.
आधीही झाली आहे अशी मागणी
पुणे शहराचे नाव बदलण्याची मागणी यापूर्वीही अनेकदा झाली आहे. विविध संघटना आणि नेत्यांकडून वेळोवेळी पुणे शहराचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड आणि इतर काही नेत्यांनी पुण्याचे नाव 'जिजापूर' किंवा 'जिजाऊ नगर' करण्याची मागणी केली होती.