पुणे पदवीधर मतदारसंघावरून खासदार सुनील तटकरेंनी नाराजी व्यक्त केलीय. पुण्यातील जागा आमची होती. ही जागा मिळवण्यासाठी कमी पडलो. हे आमचं सामूहिक अपयश आहे, अशी प्रतिक्रिया तटकरेंनी दिलीय. मैत्रीपूर्ण लढण्यापेक्षा महायुती म्हणून निवडूक लढली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. आगामी काळात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असंही त्यांनी म्हटलं आहे.
पुण्याची जागा आम्हाला मिळवता आली नाही हे आमचे सामुहिक अपयश आहे. दादाxच्या हयातीत ही जागा आणि त्यासाठी आवश्यक मतदान आमच्याकडे होते. लाड जरी तिकडे गेले तरी त्यांना झालेले मतदान आमचे होते. आम्ही जागा मिळवण्यात कमी पडलो. आगामी काळात अशा बाबी घडू नये यासाठी सुनेत्रा वहिंनींच्या नेतृत्वात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची भेट घेऊ असं सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे.
भाजप विरुद्ध शिवसेना सामना रंगण्याची शक्यता
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना सामना रंगण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात भाजपनं कौस्तुभ गावडेंना उमेदवारी दिलीय. तर शिवसेनेच्या मंगेश चिवटे आणि उदय सामंत यांचं स्वीय सहायक सचिन सानप यांनीही उमेदवारी अर्ज भरलाय. यावर आता मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आलीय. पुणे शिक्षक मतदारसंघात एकमत झालं नाही, मात्र पुन्हा एकदा चर्चा होईल असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर
विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आलेत. शिवसेनेने शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे यांना उमेदवारी जाहीर केलीय. चिवटेंनी आज उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीतील बेबनावाला आता अधिकृत स्वरूप आलंय. दरम्यान शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या गेल्या निवडणुकीतील नाशिक पॅटर्नला प्रत्युत्तर देण्याची खेळी शिवसेनेकडून पुण्यात खेळली जाते का? याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झालीय.
मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला स्वतः एकनाथ शिंदे यांनी दुजोरा दिलाय. चिवटे यांना AB फॉर्म दिल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र या सगळ्या घडामोडींवरून महायुतीतील अंतर्गत मतभेद आता लपून राहिलेले नाहीत. शिंदे यांची दिल्लीवारीही या पार्श्वभूमीवर चर्चेत आलीय. चिवटे यांच्या उमेदवारीचं भवितव्य शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर स्पष्ट होईल, अशी चर्चा आहे. अर्ज माघारीपर्यंत चर्चेची शक्यता असल्याचं शिंदे यांनीही म्हटलंय. पुणे शिक्षक मतदारसंघात एकमत झालं नाही.. मात्र पुन्हा एकदा चर्चा होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.
पण महायुतीच्या या राजकारणात आता दुसराही ट्विस्ट आलाय. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन सानप यांनी बंडखोरी केलीय. सानप यांनी आधीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. म्हणजेच भाजपचे कौस्तुभ गावडे, शिवसेनेचे मंगेश चिवटे, आणि शिवसेनेचेच बंडखोर डॉ. सचिन सानप अशी तिरंगी समीकरणं तयार झालीयत.