पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू
सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात ही काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली आहे. विहिरीच्या कठड्याचे दगड आणि मातीचा ढिगारा अचानक कोसळला. आणि चार कामगार थेट 50 फूट खोल विहिरीत अडकले आहेत.
पंढरपूर न्यूज : पंढरपूर तालुक्यातील आंबे गाव इथं विहिरीचा भाग कोसळून घडलेल्या दुर्घटनेत चार कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विहिरीत दगड आणि मातीच्या ढिकार्याखाली अडकलेल्या कामगारांच्या शोधकार्यासाठी NDRF दाखल झाली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयेन हे मागील काही तासांपासून घटनास्थळावर सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत.
15 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान आंबे गावातील निवास शिंदे यांच्या विहिरीचा वरील दगड आणि मातीचा भाग विहिरीत कोसळला. काम पूर्ण झालेल्या विहिरीचे मोजमाप घेण्यासाठी चार कामगार 50 फूट खोल विहिरीत उतरले होते. त्याच वेळी अचानक विहिरीच्या दगड आणि मातीचा ढिगारा काही क्षणात कामगारांच्या अंगावर कोसळला. काही क्षणात कामगार या खाली अडकले गेले. तिथेच असणाऱ्या पोकलेन मदतीने विहिरीतील दगड मातीचा ढीग काढण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र या मध्ये काही अडचणी येत होत्या ही बाब प्रशासनाला लक्षात आल्यानंतर तातडीने एनडीआरएफ पथकाला बोलवण्यात आले.
रात्रीची वेळ असली तरी लाईटचे व्यवस्था करून या ठिकाणी तातडीने विहिरीत पडलेले मोठे दगड आणि मातीचे ढिगारे बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ पथक काम करणार आहे यानंतर गड आणि मातीच्या ढिगार्याखाली अडकल्या कामगारांच्या बद्दल झालेली परिस्थिती समोर येणार आहे.
नेमकं काय घडलं?
विहिरीचं काम पूर्ण झालं होतं. पाण्याचा शोधही लागला होता. उरलं होतं फक्त शेवटचं मोजमाप. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अचानक विहिरीच्या कठड्याचे दगड आणि मातीचा ढिगारा कोसळला आणि क्षणार्धात चार कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले. मंगेश मोरे, सिद्धेश्वर घाडगे, तानाजी घोडके आणि आबा घोडके अशी या कामगारांची नावे आहेत. 50 फूट खोल विहिरीत चौघही अडकले.
श्रीनिवास शिंदे यांच्या शेतात गेल्या 15 दिवसांपासून विहिरीचं काम सुरू होतं. पोकलेन आणि मजुरांच्या मदतीने विहीर खोदण्यात आली. 50 फूट खोली आणि 20 फूट व्यासाची विहीर. विहिरीला पाणीही लागलं होतं. आज सकाळी 9 ते साडेनऊच्या सुमारास चार कामगार अंतिम मोजमापासाठी विहिरीत उतरले. मात्र त्याचवेळी वरच्या भागातील दगड आणि मातीचा मोठा ढिगारा कोसळला. चारही कामगार थेट ढिगाऱ्याखाली दबले गेले. काही क्षणांचा अवधी आणि होत्याचं नव्हतं झालं. ज्या विहिरीचं काम पूर्ण झालं होतं. त्याच विहिरीत 4 कामगार मृत्यूच्या दाढेत अडकले आहेत.