कोल्हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलत्याच्या घरातून लंपास केलेले 15 तोळ्यांचे दागिने विकून पुतण्याने थार गाडी घेतली. इतकंच नव्हे तर या गाडीच्या पूजेसाठी चुलत्यालाच आमंत्रण धाडलं. मात्र नंतर असं काही घडलं की बिंग पुतण्याचं बिंग फुटलं. कोडोली पोलिसांनी समर चव्हाण वय 19 याला ताब्यात घेतलं आहे.
चुलत्याच्या घरातून 15 तोळे सोन्याचे दागिने चोरले ते दागिने विकून आलेल्या पैशातून चक्क नवी थार खरेदी केली आणि थारच्या पूजेसाठी चुलत्यालाच निमंत्रण दिलं. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील सातवे गावात हा प्रकार समोर आलाय. समर चव्हाण असं संशयित तरुणाचं नाव असून, कोडोली पोलिसांनी त्याला आणि चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनाराला ताब्यात घेतलंय.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात असलेल्या सातवे गावात चोरीचा हा धक्कादायक प्रकार घडलाय. समर पोपट चव्हाण याने आपले चुलते उमेश मारुती चव्हाण यांच्या घरातून महिन्याभरापूर्वी 15 तोळे सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. हे दागिने त्याने गावातीलच सोनार संग्राम बाबासो मोरे याला विकल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय. या दागिन्यांच्या बदल्यात त्याला सुमारे दहा लाख रुपये मिळाल्याची माहिती आहे. याच पैशातून त्याने चक्क नवी थार खरेदी केली.
नवी कोरी थार घरी आणल्यानंतर समरने गाडीच्या पूजेसाठी चुलते उमेश चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आमंत्रित केलं. मात्र, पूजेसाठी तयार होत असताना उमेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नीने दागिने शोधले असता ते चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
विशेष म्हणजे, घरातील आजीचे दागिने सुरक्षित होते. मात्र उमेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नीचेच दागिने गायब होते. त्यामुळे चोरी घरातील किंवा जवळच्या व्यक्तीने केली असावी, असा संशय त्यांना आला. यानंतर उमेश चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी कोडोली पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या अनुषंगाने तपास करताना पोलिसांनी समर चव्हाण याच्या नव्या थारबाबत चौकशी केली. त्याच्या नव्या गाडीच्या खरेदीसाठी पैसे कुठून आले, याचा तपास करताना चोरीचा उलगडा झाल्याची माहिती आहे.