SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'गोकुळ' गोंधळादरम्यान हसन मुश्रीफांना मोठा दिलासा! ₹100 कोटी फसवणूक प्रकरण ED कडून कायमचं बंद; 40 हजार शेतकऱ्यांना गंडवल्याचा नेमका आरोप काय होता?

मागील चार वर्षांपासून मुश्रीफ पिता-पुत्रांविरोधात सुरु असलेलं हे प्रकरण आता कायमचं बंद करण्याचा निर्णय कोर्टाने घेतला आहे. ईडीने कोर्टात असं नेमकं काय सांगितलं की हे प्रकरण बंद करण्यात आलंय जाणून घ्या सविस्तरपणे...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 06, 2026, 09:00 AM IST | Updated: Nov 06, 2026, 09:21 AM IST
Image Credit: मागील चार वर्षांपासून सुरु होतं हे प्रकरण (प्रातिनिधिक फोटो)
Join

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच 'गोकुळ'संदर्भातील गोंधळ सुरु असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीवरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांसमोर 'गोकुळ'ची निवडणूक लढणारे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा दिलासा अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने दिला आहे.

ते प्रकरण अधिकृतपणे बंद

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (PMLA - Prevention of Money Laundering Act, 2002) अंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांची सुनावणी करण्यासाठी आणि त्यावर निर्णय देण्यासाठी केंद्र सरकारच्या किंवा उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने स्थापन केलेल्या मुंबईतील विशेष सत्र न्यायालयासमोर ईडीने क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. मुश्रीफ यांच्यासंदर्भातील प्रकरणांचा हा क्लोजर रिपोर्ट कोर्टाने स्वीकारला आहे. यामुळे हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलाविरोधातील 2022 चं मनी लाँड्रिंगचं प्रकरण अधिकृतपणे बंद करण्यात आलं आहे. या निर्णयाबद्दल बोलताना हसन मुश्रीफ यांनी, "मी न्यायदेवतेचा आभारी आहे, मला दिलासा मिळाला. न्यायदेवतेने चांगला निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे माझी दिवाळी गोड झाली," असं म्हटलं आहे.

नेमके आरोप काय होते?

कोल्हापूरमधील सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित हे मनी लाँड्रिंगचं प्रकरण होतं. कारखान्यामध्यचे शेअरहोल्डर करण्याचे आश्वासन देऊन सुमारे 40 हजार शेतकऱ्यांकडून 100 कोटी रुपयांचा निधी गोळा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. गोळा केलेला हा पैसा विविध कंपन्यांमार्फत हसन मुश्रीफ यांच्या मुलांच्या कंपन्यांकडे वळवण्यात आल्याचा (मनी लाँड्रिंग) संशय ईडीला होता. मार्च 2022 मध्ये पुणे येथील कंपनी नोंदणी कार्यालयाने (आरओसी) केलेल्या तक्रारीवरून आणि फेब्रुवारी 2023 मध्ये कोल्हापूरच्या मुरगूड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने या प्रकरणात तपास सुरू केला होता. ईडीने स्वत: 2022 मध्ये या संदर्भात गुन्हा (ईसीआयआर) दाखल केला होता. तपासामध्ये मुश्रीफ यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकून 2.15 कोटी रुपयांच्या ठेवी आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली होती.

...म्हणून ईडीने बंद केला तपास

जून 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मुरगूड पोलिसांच्या एफआयआर संदर्भातील 'सी-समरी' रिपोर्ट स्वीकारून तो गुन्हा निकाली काढला होता. तसेच, नोव्हेंबर 2025 मध्ये उच्च न्यायालयाने 'आरओसी'ची तक्रारही रद्द केली. 2013-14 मधील कथित प्रकरणांना कंपनी कायद्यातील 2021 मधील नवीन दुरुस्त्या पूर्वलक्षी प्रभावाने लागू केल्या जाऊ शकत नव्हत्या, असं सांगत 'आरओसी'ची तक्रार रद्द करण्यात आली. ज्या दोन प्रकरणांच्या आधारे ईडी तपास करत होती तीच मागे घेण्यात आली. मनी लाँड्रिंगचा तपास सुरू ठेवण्यासाठी मूळ गुन्हा प्रलंबित असणे आवश्यक असते. हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील दोन्ही मूळ तक्रारी आणि गुन्हे रद्द झाल्यामुळे, ईडीने विशेष न्यायालयात आपली बाजू मांडली. त्यावेळी ईडीने सांगितले की आता मनी लाँड्रिंगचा तपास पुढे सुरू ठेवण्याचे कोणतेही कायदेशीर कारण उरलेले नसल्याने प्रकरण बंद करण्यात यावं. हा प्रस्ताव कोर्टाने स्वीकारत मुश्रीफ पिता-पुत्रांना मोठा दिलासा दिलाय.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES