आतापर्यंत तुम्ही दोन देशांमधील युद्धांच्या अनेक बातम्या वाचल्या, पाहिल्या असतील. युद्धादरम्यान एका देशाने दुसऱ्या देशावर हल्ला करणे किंवा एखाद्या देशातील गटाने दुसऱ्या देशाला लक्ष्य करण्याचे प्रकार अनेकदा वाचायला/बघायला मिळतात. युद्ध सुरु करणं हे सहज सोपं असतं मात्र ते थांबवणं कठीण, असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं. तसेच युद्धाची मोठी किंमत मोजावी लागते, हे वाक्यही अनेकदा अनेकांच्या वाचनात आलं असेल. सध्या याच वाक्याचा प्रत्यय एका देशाला येत असून ही मोठी किंमत आहे पाच लाख कोटी रूपये! आकड्यांमध्ये सांगायचं झालं तर ही रक्कम ₹5000000000000 इतकी होते. ही रक्कम केवळ हल्ले रोखण्यासाठीची तडजोडीची रक्कम आहे.
कोणी आणि कोणाकडे केली आहे ही मागणी?
आता ही मागणी केली आहे, येमेनमधील हुती बंडखोरांनी! इराणचं समर्थन असलेल्या हुती बंडखोरांनी ही 51 अब्ज डॉलर्स म्हणजेच 5 लाख कोटी रुपायांची मागणी सौदी अरेबियाकडे केली आहे. नुकसानभरपाई म्हणून ही रक्कम हवी असल्याचा दावा हुती बंडखोरांनी केल्याचं वृत्त 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने दिलं आहे. या वृत्तानुसार, सौदी अरेबियासोबत सुरू असलेला संघर्ष आणि सौदी अरेबियावरील हल्ले थांबवण्यासाठी हुती बंडखोरांनीनी या एवढ्या रक्कमेची अट ठेवली आहे.
एवढा पैसा कशाच्या मोबदल्यात मागितला आहे?
सौदी अरेबियाने गेल्या काही वर्षांत येमेनमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये झालेलं नुकसान तसेच त्यांनीच लादलेल्या नाकेबंदीने झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई म्हणून हुती बंडखोरांनी पाच लाख कोटी रुपये मागितले आहेत. या रकमेबरोबरच अजून एक महत्त्वाची मागणी करण्यात आली असून या मागणीनुसार, सौदी अरेबियाने हुती बंडखोरांना येमेनचे अधिकृत आणि कायदेशीर शासक म्हणून मान्यता द्यावी, अशीही अट या तडजोडीच्या चर्चेदरम्यान ठेवण्यात आली आहे.
का हे हल्ले थांबवण्याचे प्रयत्न सुरु आहेत?
मागील काही काळापासून हुती बंडखोरांनी रेड सी म्हणजेच लाल समुद्रामधील सौदी अरेबियाच्या तेलवाहू जहाजांवर आणि सौदी अरेबियाच्या विमानतळांवर हल्ले केल्याचं दिसून आलं आहे. हे सर्व हल्ले तीव्र स्वरुपाचे असून त्यामुळे सौदीमधील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. एकीकडे सौदी अरेबियावर हल्ले सुरु असतानाच दुसरीकडे हुती बंडखोरांनी येमेनमध्येही मजल दरमजल करत मोखासारख्या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळवला आहे. नागरिकांमधील भीतीचं वातावरण आणि जागतिक स्तरावरील गुंतवणुकीवर होणारा परिणाम पाहता सदर हल्ले थांबवण्यासाठी सौदी अरेबियाने हुती बंडखोरांशी मध्यस्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. हुती बंडखोरांनी पाच लाख कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितल्यामुळे आता सौदी अरेबिया मोठ्या राजकीय आणि आर्थिक पेचात सापडला आहे. हुती बंडखोरांची ही मागणी सौदी अरेबिया मान्य करणार की या बंडखोरांचा बिमोड करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.