बंगालच्या उपसागरात तयार झालेले मुरासू चक्रीवादळ निवळल्यानंतर राज्यात पाऊस थांबला आहे. पाऊस थांबताच पुन्हा एकदा हवामानात बदल झाले आहेत. राज्यात पुन्हा एकदा उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. आज राज्यात ढगाळ हवामान असून तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.
मुरासू चक्रीवादळानंतर राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता चक्रीवादळाची स्थिती निवळल्यानंतर राज्यात पुन्हा उकाडा वाढला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळं ऐन दिवाळीत नागरिकांना उन्हाचे चटके बसत आहेत. मुंबईतील कुलाबा येथे राज्यातील उच्चांकी 36.9 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिकसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यात 6 नोव्हेंबर रोजी कोरडे हवामान राहणार आहे. रायगड आणि रत्नागिरीत जिल्ह्यातही कोरडे हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं आज राज्यात कुठेच पावसाची चिन्हे नाहीत.
दिवाळी सुरू झाली तरी अद्याप राज्यात थंडीची चाहुल लागली नाहीये. एकीकडे राज्यातील काही भागात उन्हाचा चटका वाढतोय. तर, काही ठिकाणी पहाटे गारवा जाणवतोय. तर दुपारी उन्हाच्या झळांनी हैराण व्हायला होते. गुरुवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निच्चांकी 15.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्राच्या तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कमाल तापमानाचा पारा 35 अंशांच्या पुढे गेला आहे.
नोव्हेंबरमध्ये उन्हाची काहिली
नोव्हेंबर महिन्यातही उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. महाराष्ट्रासह देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील काही भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. प्रशांत महासागरातील 'एल निनो' स्थितीची तीव्रता आगामी काही दिवसांत वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम देशातील तापमानावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नोव्हेंबरही तापदायक जाणार आहे.