इस्रायलचे विद्यमान पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांना पायउतार व्हावं लागणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. 120 सदस्यांच्या संसदेत अरबांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन पक्षांनी यशर पक्षाचे नेते गादी आयसेनकोट यांना पाठिंबा जाहीर केला आहे. इस्रायलमधील प्रमुख अरब राजकीय पक्षांची आघाडी असलेल्या ‘जॉइंट लिस्ट’ने आयसेनकोट यांना पाठिंबा जाहीर केल्याने नेतान्याहू यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. आता नेतान्याहू यांना पंतप्रधानपद सोडावं लागणार आहे.
कोणाला किती जागा मिळाल्या?
इस्रायलमधील सर्वोच्च कायदेमंडळ अशी ओळख असलेल्या वनेसेटसाठी 27 ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. 120 जागा असलेल्या वनेसेटमध्ये बहुमताचा आकडा हा 61 इतका आहे. मात्र नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या लिकुड आणि चार ज्यू पक्षांच्या आघाडीला 53 जागा मिळाल्यात. तर यशर पक्षाच्या आघाडीला 48 जागांवर विजय मिळाला. या निवडणुकीमध्ये अरबांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षांना 19 जागा मिळवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
अति-उजव्या पक्षानेही दिला धक्का
नेतान्याहू यांना अजून एक धक्का दिला तो 'युनायटेड तोराह ज्युडाइझम' या अति-उजव्या पक्षाने. नेतान्याहू यांच्या लिकुडला हा अति-उजवा पक्ष पाठिंबा देईल असं वाटत होतं. मात्र त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे नेतन्याहू यांच्या निरोपावर शिक्कामोर्तब झालं आहे. इस्रायलमध्ये सरकार स्थापन करण्याची जबाबदारी राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांच्यावर आहे. 11 नोव्हेंबरपर्यंत इस्रायलमध्ये नवीन सरकार स्थापन करावं लागणार आहे. तोपर्यंत सरकार स्थापन झालं नाही तर पुन्हा निवडणुकीची घोषणा करावी लागेल.
इस्रायलच्या राजकारणाला नवं वळण
सध्याची आकड्यांची स्थिती पाहता अध्यक्ष आयझॅक हरझॉग लवकरच गादी आयसेनकोट यांना सरकार स्थापनेचे आमंत्रण देण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. खरोखरच गादी आयसेनकोट पंतप्रधान झाले तर या माध्यमातून इस्रायलच्या राजकारणाला नवं वळण मिळेल. पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या हातातून सत्ता जाणार हे स्पष्ट झाल्याने प्रमुख विरोधक आणि माजी लष्करप्रमुख गादी आयसेनकोट यांच्या पंतप्रधान होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रविवारी हरझॉग हे पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करणार असल्याचे समजते.
विरोधकांच्या सरकारला किती पाठिंबा?
‘जॉइंट लिस्ट’ने दिलेल्या पाठिंब्यामुळे गादी आयसेनकोट यांच्या नेतृत्वाखाली यशर पक्षासोबत निवडणूक लढलेल्या विरोधी आघाडीचं सरकार इस्रायलमध्ये सत्तेत येणार आहे. विरोधकांनी सरकार स्थापनेसाठी आवश्यक बहुमताचा 61 जागांचा टप्पा पार करत 67 सदस्यांचं समर्थन मिळणार असल्याची माहिती आहे. ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेनं ही बातमी दिली आहे. 'जॉइंट लिस्ट'नं अधिकृत निवेदन जारी करत अध्यक्ष आयझॅक हरझॉग यांच्याकडं सरकार स्थापनेसाठी आम्ही यशर पक्षाचे नेते गादी आयसेनकोट यांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे.