नाशिकच्या सटाणा शहरात शासकीय अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून व्यापाऱ्यांची दिशाभूल करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आम्ही अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी आहोत, असे सांगत आरोपी थेट मिठाईच्या दुकानात शिरायचे, परवाने तपासायचे, त्रुटी काढायच्या आणि दुकानदारावर दबाव निर्माण करायचा. मात्र, यावेळी दुकानदारानेच या कथित अधिकाऱ्यांची फिरकी घेतली! ओळखपत्र मागताच तिघांची भंबेरी उडाली. अखेर पोलिसांच्या मदतीने तिन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले
सटाणा शहरातील नाशिक नाका परिसरात गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला. मिठाई दुकानासमोर एक कार येऊन थांबली. कारमधून उतरलेले तीन अनोळखी इसम थेट दुकानात दाखल झाले. आपण नाशिक येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा विभागातून आल्याचे सांगत त्यांनी दुकानाचे परवाने दाखविण्याची मागणी केली
एवढ्यावरच न थांबता दुकानातील स्वच्छता योग्य नसल्याचे, परवाना योग्य ठिकाणी लावलेला नसल्याचे सांगत त्यांनी परवान्याचे छायाचित्रही काढले. त्यांच्या बोलण्यावर सुरुवातीला दुकानदाराने विश्वास ठेवला. मात्र तिघांच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्याने दुकानदार रोहित सोनवणे यांनी थेट अधिकृत ओळखपत्राची मागणी केली आणि इथेच सगळा खेळ बिघडला!
ओळखपत्राचा विषय निघताच तिघेही गडबडले. ओळखपत्र दाखविण्याऐवजी त्यांनी दुकानातून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुकानदाराने प्रसंगावधान राखत नाशिक येथील अन्न सुरक्षा विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधला. कार्यालयाकडून सटाणा येथे तपासणीसाठी कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी पाठविण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या तिघांच्या अधिकाऱ्यांच्या बतावणीचा पर्दाफाश झाला
त्यानंतर तिघेही कारमधून ताहाराबादच्या दिशेने पसार झाले. मात्र, दुकानदाराने हार न मानता दुचाकीवरून त्यांचा पाठलाग सुरू केला आणि पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, संशयितांनी विमल स्वीट्स दुकानाजवळ कार थांबवली. तेथे दुकानात जात असतानाच दुकानदार आणि पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले
पोलिसांनी त्यांच्याकडे ओळखपत्र आणि चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आपण अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तिघांना सटाणा पोलीस ठाण्यात आणले या प्रकरणात विश्वास शिवाजी उफाडे, भगवान कचरू आहिरे आणि स्वप्निल रमेश बागुल अशी संशयितांची नावे समोर आली आहेत दुकानदाराच्या तक्रारीनुसार, शासकीय अधिकारी असल्याची बतावणी करून दुकानाची तपासणी केल्याचा आरोप करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दुकानदाराने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे हा प्रकार उघडकीस आला. मात्र, शहरातील इतर व्यापाऱ्यांच्या बाबतीतही असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला दुकानात तपासणी करू देण्यापूर्वी त्याचे अधिकृत ओळखपत्र आणि विभागाकडील प्राधिकृत आदेश तपासून खात्री करावी. संशय आल्यास तातडीने पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात येत आहे.