तमाशा, जुगाराचा नाद त्यातून घडलं भयानक हत्याकांड, बारामतीतील दोन वृद्ध महिलांच्या हत्येचा उलगडा
शेरेवाडी मधील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. त्या दोन वृद्ध महिलांचा मारेकरी गजाआड झाला आहे.
बारामती तालुक्यातील शेरेवाडी मध्ये इंदुमती लडकत आणि कृष्णाबाई लडकत या दोन वृद्ध महिलांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या गुन्हाचा अखेर उलगडा झाला असून 25 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे.
विकास उर्फ आप्पा लडकत वय 25 वर्ष असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. धक्कादायतक म्हणजे, आरोपी हा मयत महिलांच्या नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. जुगाराचा नाद आणि कर्जबाजारीपणा यातून चोरीच्या उद्देशाने हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.
इंदुमती लडकत आणि कृष्णावाई लडकत अशी चुलत सासू-सुनांची नावे आहेत. मंगळवारी 29 सप्टेंबर रोजी त्यांची निर्घृण हत्या झाली होती. हत्येनंतर त्यांच्याकडील सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. त्यामुळं घरात दरोड्याच्या उद्देशाने त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.
दोन्ही महिलांच्या हत्येचा उलगडा करण्यासाठी 10 अधिकारी आणि 55 पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकानं या प्रकरणाचा तपास केला. पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्यासाठी अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, बीड, कोल्हापूर येथे पथके पाठवण्यात आली होती. या पथकांनी रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी केली. त्याचवेळी पोलिसांनी घराशेजारीही लक्ष ठेवले. तेव्हा पोलिसांना आरोपीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, सोन्याच्या दागिन्यांसाठी दोन्ही महिलांची हत्या केल्याचे विकास याने सांगितले आहे. त्याला तमाशा, जुगाराचे व्यसन आहे. त्यातून तो कर्जबाजारी झाला होता. कर्जफेडण्यासाठी त्यांनी दागिने चोरण्याचा डाव होता, असे तपासात समोर आले आहे. अखेर विकास याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले असून, चोरीचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. रात्री एक ते दीडच्या सुमारास हा गुन्हा घडल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिली आहे.