पुणे कोर्टाबाहेर ज्यावर हल्ला झाला तो मंदार किवळे कोण? हल्ल्यामागील धक्कादायक कारणही आलं समोर
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या 4 नंबर गेटजवळ एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. ज्यात तो व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. तो कोण होता आणि त्याच्यावर हल्ला का करण्यात आला यासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आज भरदिवसा पुण्यामध्ये गँगवारचा थरार पाहिला मिळाला. पुण्यातील सर्वात वर्दळ असलेल्या शिवाजीनगर कोर्टात एका व्यक्तीवर पाच ते सहा जणांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केला. पाच ते सहा जणांनी त्या व्यक्तीवर दोन राऊंड गोळीबार केला. त्या गोळीबारात तो व्यक्ती थोडक्यात बचावला म्हणून त्याच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. ज्यात त्या व्यक्तीचा एक हात तुटला. पुण्यात भरगर्दीत रक्तरंजित थरार परिसरातील अनेक लोकांना उघड्या डोळ्यांनी पाहिला. या थरारक हल्लेचा व्हिडीओ समोर आला आहे. तर हल्ला झालेला व्यक्ती कोण होता, त्यावर हा हल्ला का झाला याबद्दलची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तो मंदार किवळे कोण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव मंदार मारुती किवळे असं आहे. 20 एप्रिल 2025 रोजी पुण्यातील कात्रज परिसरातील संतोषनगर इथल्या जमिनीच्या/आर्थिक वादातून शुभम सुभाष चव्हाण याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात मंदार मारुती किवळे हा आरोपी होती. विशेष म्हणजे चार दिवसापूर्वी तो तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता. आज न्यायालयीन कामकाजासाठी आला असता, त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
हेसुद्धा वाचा - पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर भरदिवसा गोळीबार, एकाचा मृत्यू; 5-6 जण गेट नंबर 4 मधून आले अन्... नेमकं झालं काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला गँगवॉरमधून झाला आहे. कारण मंदार मारुती किवळे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. शुभम या तरुणाची 20 एप्रिल 2025 ला चौघांनी मिळून निर्घृण हत्या केली होती. शुभमच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी अमर दिलीप साकोरे (वय 40) याच्यासह मंदार मारुती किवळे (वय 35), गिरीश सुभाष बाबरे (वय 25) आणि योगेश बाबुराव ढोरे (वय 35) ला अटक करण्यात आली होती.
कशी झाली होती शुभमची हत्या?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम चव्हाण आणि मुख्य आरोपी अमर साकोरे यांच्यामध्ये जमिनीवरून वाद सुरू होता. 20 एप्रिल 2025 ला शुभम पहाटे कात्रजमधील संतोषनगर परिसरात होता. त्यावेळी अमर, मंदारसह अन्य दोघांनी शुभमला रस्त्यात अडवलं आणि त्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या हल्ल्यातून शुभमने आपली सुटका करत पळ काढला. पण हल्लेखोऱ्याने त्याचा पाठलाग करत परत पकडलं आणि बांबूने मारहाण केली. त्यात शुभमच्या डोक्याला मार लागला आणि त्याचा मृत्यू झाला.
हल्लेखोरांनी तरुणावर हल्ला केल्यानंतर ते घटनास्थळावरून फरार झाले आहेत. मंदार हा कोर्टाच्या आवारात रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला होता. या हल्ल्यात मंदाराचा एक हात कोयत्याने छाटण्यात आला. हल्लेखोराने मंदारवर कोयत्याने सपासप वारे केले. मंदारच्या डोक्यावरही गंभीर दुखापत झाली आहे. अर्धमेल्या अस्वस्थेत तो रस्त्याच्या कडेला पडलेला होता. त्याला परिसरातील पोलिसांनी रुग्णालयात नेले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.