'त्यावेळी आम्ही देखील...', फडणवीस सरकारने 'गोकुळ'वर 4 अतिरिक्त संचालक नेमल्यानंतर सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया; 'साडेपाच लाख...'
19 ऑक्टोबर रोजी लागलेल्या गोकुळ निवडणुकीच्या निकालामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील समितीने 25 पैकी 13 जागा जिंकल्या. तर महायुतीचे उमेदवार 12 जागांवर निवडून आले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच 'गोकुळ'च्या संचालक मंडळावर 4 शासकीय संचालक नियुक्त करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बुधवारी घेण्यात आला. यासंदर्भातील प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्यानंतर या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा विजय मिळून देणारे आमदार सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. सतेज पाटील यांनी या निर्णयानंतर थेट 2029 च्या निवडणुकीचा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांना इशारा दिलाय.
नेमका हा गोंधळ काय?
19 ऑक्टोबर रोजी लागलेल्या गोकुळ निवडणुकीच्या निकालामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील समितीने 25 पैकी 13 जागा जिंकल्या. तर महायुतीचे उमेदवार 12 जागांवर निवडून आले. महायुतीचया संचालकांनी अनुपस्थित राहून अध्यक्षपदाची निवडणूक रोखून धरल्याचा आरोप निवडून आलेल्या 'समविचारी आघाडी'च्या 13 सदस्यांनी केला. या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने 10 नोव्हेंबर रोजी पुन्हा निवडणूक घेण्याचे निर्देश दिले. राज्य मंत्रिमंडळाने मतदानाचा हक्क असलेल्या चार सरकारी संचालकांना नामनिर्देशित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे निवडणुकीचे गणित बदलण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस समर्थकांकडून नाराजी व्यक्त होत असतानाच एकट्याच्या जीवावर ही निवडणूक फिरवणाऱ्या सतेज पाटलांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पहिली प्रतिक्रिया नोंदवताना संताप व्यक्त केला आहे.
लोकशाहीचा खून
"(4 शासकीय संचालक नेमण्याचा) हा निर्णय म्हणजे लोकशाहीचा खून आहे. साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जनाधाराचा हा अवमान आहे," अशी पहिली प्रतिक्रिया सतेज पाटलांनी नोंदवली आहे. इतक्यावरच न थांबता सतेज पाटील यांनी निवडणुकाच न घेण्याचा सल्लाही दिलाय. मागच्या दाराने अशाप्रकारे संचालक घुसवून सत्ता बळकावण्याचा प्रयत्न होणार असेल, तर मग सहकारात निवडणुका घेण्याला काही अर्थच उरणार नाही. अशा वेळी थेट निवडणुकाच घेऊ नका, असं म्हणत सतेज पाटलांनी सरकारला सुनावलं आहे.
न्यायालय आणि रस्त्यावरील लढ्याची तयारी
सतेज पाटील यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढाई देण्याचे संकेत दिलेत. या अन्यायकारक आणि सूडबुद्धीच्या निर्णयाविरोधात शांत बसणार नसून न्यायालयात जाऊन सर्व कायदेशीर मार्ग वापरणार असल्याचं सतेज पाटलांनी स्पष्ट केलं आहे. केवळ न्यायालयीन लढाई नाही तर थेट रस्त्यावर उतरण्याची तयारीही सतेज पाटलांनी दाखवली आहे. स्वाभिमानी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा थेट कौल पायदळी तुडवला जात असेल, तर शेतकऱ्यांच्या हितासाठी थेट रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन करण्याची आमची तयारी आहे, असंही सतेज पाटील म्हणालेत.
2029 मध्ये राज्यात...
सतेज पाटील यांनी थेट 2029 च्या निवडणुकीचा संदर्भ देत सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. "आज अशापद्धतीने सत्तेच्या दंडूकशाहीचा वापर करून निर्णय घेतले जात असले तरी 2029 मध्ये राज्यात पुन्हा सत्ता बदल होणार. त्यावेळी आम्ही देखील या सर्व गोष्टी लक्षात ठेवू," अशा कठोर शब्दांमध्ये सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिलाय.
महायुतीचा पळपुटेपणा
महायुतीच्या 12 संचालकांनी अध्यक्ष निवडीच्या सभेला गैरहजर राहून कोरम होऊ दिला नाही, हा महायुतीचा पळपुटेपणा असल्याचा टोलाही सतेज पाटलांनी लगावला.