भोसरीतील अत्यंत धक्कादायक प्रकार, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराने दिलेला पुरावा पाहून निवडणूक आयोगही हादरले
भोसरीतील अत्यंत धक्कादाक प्रकार समोर आला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणूक पराभव झालेल्या शरद पवारांच्या उमेदवाराने धक्कादायक दावा केला आहे.
भोसरी : नोव्हेंबर 2024 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तत्कालीन उमेदवार अजित गव्हाणे यांनी केली होती, ज्याची आता मुख्य निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. भोसरीतील अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळेच 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याचा दावा अजित गव्हाणे यांनी केला आहे.
निवडणुकीच्या ऐनवेळी हजारो मतदारांचे पत्ते त्यांच्या अनुमतीशिवाय परस्पर बदलल्याने ते मतदानापासून वंचित राहिले आणि त्याचा फटका आपल्याला पराभवाच्या रूपाने बसला, असा आरोप करत गव्हाणे यांनी परस्पर स्थलांतरित केलेल्या मतदारांच्या यादीच्या पुराव्यासह आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणी यापूर्वीच निगडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात चार वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांचा वापर करून सुमारे 40 मतदारांचे परस्पर स्थलांतर केल्याचे नमूद करण्यात आले होते, तसेच या गैरप्रकाराबाबत आपण तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही अवगत केले होते आणि त्यांनी चौकशीच्या सूचना दिल्या होत्या, असा दावाही अजित गव्हाणे यांनी केला आहे.
2024 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी मतदारसंघातील हजारो मतदारांची नावे अचानक मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, स्थानिक मतदारांची ही नावे भोसरीतून गायब होऊन थेट छत्रपती संभाजीनगर, ठाणे आणि अंबरनाथ यांसारख्या इतर शहरांतील मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप मतदारांनी केला आहे.
एका बाजूला निवडणुकांकडे लोकशाहीचा उत्सव म्हणून पाहिले जात असताना, दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे मतदानाच्या हक्कावर गदा आणून मतदारांची फसवणूक होत असेल, तर दाद आणि न्याय कोणाकडे मागायचा, असा संतप्त सवाल बाधित नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.